गरोदर पत्नीचा खून करून मृतदेह फेकला ओढ्यात; 'रविराज' टॅटूवरून १० दिवसांनी खुनाचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 16:31 IST2025-10-24T16:30:38+5:302025-10-24T16:31:11+5:30
पत्नीच्या अनैतिक संबंधांवरून दोघांमध्ये वाद होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गरोदर पत्नीचा खून करून मृतदेह फेकला ओढ्यात; 'रविराज' टॅटूवरून १० दिवसांनी खुनाचा उलगडा
भिगवण : बारामती- अहिल्यानगर रोडवरील (मदनवाडी ता.इंदापूर) गावाच्या हद्दीत ओढ्यावरील पुलाखाली पाण्यात एका गरोदर महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने भिगवण परिसरात खळबळ उडाली होती. महिला अंदाजे 25 ते 30 वर्षांची होती. तिच्या डाव्या हातावर “रविराज” असा टॅटू आढळून आला होता. पोलिसांकडे तो एकच पुरावा होता. त्यावरून अवघ्या २४ तासात खुनाचा उलगडा करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला २४ तासात अटक केली. रविराज जाधव (रा. आष्टी जि. बीड) असे या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविराज हा प्रेमविवाह करून बारामती येथे आपली पत्नी सोनाली रविराज जाधवसोबत राहत होता. पती-पत्नीमध्ये पत्नीच्या अनैतिक संबंधावरून वाद होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. १२ ऑक्टोबरला कडाक्याचे भांडण होऊन रविराजने सोनालीचा खून करून मृतदेह बारामती- राशीन रोडवरील (मदनवाडी ता.इंदापूर) गावाच्या हद्दीत ओढ्यावरील पुलाखाली पाण्यात फेकून दिला होता. भिगवण पोलिसांना (दि,२२) रोजी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्यानंतर आरोपी पतीला २४ तासातच अटक केली.
सोनाली हिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याची प्राथमिक माहिती आहे. पती रविराज याने याच कारणावरून पत्नी सोनाली हिचा (दि.१२) रोजी खून केला. त्याच रात्री मृतदेह चादरीत गुंडाळून दुचाकी स्कुटी गाडीवरून बारामती वरून २७ किलोमीटर अंतरावरील मदनवाडी ओढयात फेकून दिला होता. ओढयाजवळ स्थानिकांना दुर्गंधी जाणवल्यानंतर त्यांनी पुलाखाली जाऊन पाहणी केली असता चादरीत गुंडाळलेला मृतदेह दिसला होता. महिलेच्या हातावर इंग्रजीत रविराज असा टॅटू एवढाच पुरावा होता.
या खुनाचा तपास पोलीस अधिक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर अधीक्षक गणेश बिराजदार व उपविभागीय पोलीस अधीकारी सुदर्शन राठोड यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, तपास पोलीस अंमलदार गणेश मुळीक, पोलीस अंमलदार महेश उगले आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी केला.