सत्ता भाजपची अन् राज्य गुन्हेगारांचे; गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, पुण्यातील राष्ट्रवादीचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:26 IST2025-11-05T17:23:43+5:302025-11-05T17:26:18+5:30
पुण्यात आता सोळा सतरा वर्षाची मुलं सुद्धा गुन्हेगार होण्यापासून वाचलेली नाहीत असं विदारक चित्र आहे

सत्ता भाजपची अन् राज्य गुन्हेगारांचे; गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, पुण्यातील राष्ट्रवादीचे आंदोलन
पुणे : पुणे शहरात सध्या कायदा व सुव्यवस्था औषधालाही शिल्लक नाही. भरदिवसा खून, गोळीबार, कोयत्याने वार, लूट, टोळी युद्ध या घटना घडत आहेत. सत्ता भाजपची आणि राज्य गुन्हेगारांचे, अशी परिस्थिती होण्यास भाजप आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. ४) आंदोलन केले.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, नगरसेवकांनी जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याच्या भानगडीत पुण्यातल्या किंवा राज्यातल्या इतर शहरातले गुन्हेगार त्या काळात पोसले आहेत. त्या गुन्हेगारांना बळ दिलं गेलं आहे. तसेच पोलिसांवरही दबाव आणला आहे. त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे. कालचा खून भरचौकात बाजीराव रोडला झालेला आहे. पुण्यात आता सोळा सतरा वर्षाची मुलं सुद्धा गुन्हेगार होण्यापासून वाचलेली नाहीत असं विदारक चित्र आहे. आज पुण्यात भाजपचे सहा आमदार, खासदार केंद्रीय राज्यमंत्री आहेत. भाजपने सांभाळलेली गुन्हेगारी आता भाजपच्या अंगलट येत आहे. पुणे बिघडत चाललं आहे. म्हणून आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा. त्यांनी आता खुशाल देशभर प्रचाराला फिरावं. पण आम्हाला याठिकाणी जगणं चांगलं करण्याकरता आमची सुटका करावी एवढी आमची विनंती राहील.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली अभिनव कला महाविद्यालय चौक येथे करण्यात आलेल्या या आंदोलनात डॉ. सुनील जगताप, किशोर कांबळे, मंजिरी घाडगे, असीफ शेख, अमोल परदेशी, अजिंक्य पालकर, विष्णू सरगर, अनिता पवार, रूपाली शेलार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भाजपच्या अनागोंदी कारभाराचा, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निष्क्रिय नेतृत्वाचा निषेध व्यक्त केला.