Rupali Patil Thombare: रूपाली पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट; खंडाळकर महिलेला मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 10:04 IST2025-11-01T10:03:42+5:302025-11-01T10:04:27+5:30
पोस्ट टाकल्याचा राग मनात धरून आरोपींनी शुक्रवार पेठेतील खंडाळकर यांच्या घरी जाऊन त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली

Rupali Patil Thombare: रूपाली पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट; खंडाळकर महिलेला मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल
पुणे: अजित पवार गटाच्या रूपाली ठोंबरे पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर मत व्यक्त केल्याचा राग मनात धरून महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात तीन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रिया अमित सूर्यवंशी (४३, रा. आंबेगाव), वैशाली चंद्रशेखर पाटील (५५, रा. शुक्रवार पेठ), पूनम काशीनाथ गुंजाळ (२८) आणि अमित सूर्यवंशी (४५, रा. आंबेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत माधवी मंदार खंडाळकर (४२, रा. शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी शुक्रवार पेठेत ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खंडाळकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रूपाली ठोंबरे पाटील यांच्याबाबत एक पोस्ट टाकली होती. याचा राग मनात धरून आरोपी प्रिया, वैशाली, पूनम आणि अमित सूर्यवंशी यांनी शुक्रवार पेठेतील फिर्यादींच्या घरी जाऊन त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात फिर्यादी जखमी झाल्या. त्याचबरोबर आरोपी सूर्यवंशी याने गोंधळाच्या वातावरणात १० हजार रुपये किमतीचा मोबाईल नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. खडक पोलिस पुढील तपास करत आहेत.