पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात; आई-वडिलांकडे २ कोटींच्या तब्बल १२ मालमत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 11:37 IST2025-03-18T11:36:11+5:302025-03-18T11:37:37+5:30
दिलीप खेडकर यांच्या बंगल्याची किंमतच १० कोटींपेक्षा जास्त आहे, तसेच आता अधिकृतरीत्या ही २ कोटी रुपयांची संपत्ती उघड झाली आहे

पूजा खेडकरचा पाय आणखी खोलात; आई-वडिलांकडे २ कोटींच्या तब्बल १२ मालमत्ता
पुणे: वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात तिच्या पालकांच्या नावावर तब्बल १२ मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे. पूजा खेडकर हिच्या नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्रासंदर्भात नाशिक विभागीय आयुक्तांनी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविलेल्या अहवालात या मालमत्तांचा उल्लेख आहे. याबाबत १० मार्च रोजी सुनावणी झाली असून, पुढील सुनावणी येत्या आठवडाभरात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पूजा खेडकर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी (दि. १८) सुनावणी होणार आहे. त्यात तिच्या जामिनाबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वडील दिलीप खेडकर वर्ग एक अधिकारी असूनही पूजा खेडकर हिने नॉन क्रीमिलेअर गटातून यूपीएससी परीक्षेत आयएएस हे पद मिळविले. हे नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले होते. नाशिक विभागीय आयुक्तांनी या प्रमाणपत्राबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांनी पूजा खेडकर हिचे वडील दिलीप व आई मनोरमा खेडकर यांच्या मालमत्तांची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानुसार या दोघांच्या पॅनकार्ड नोंदीवर असलेल्या मालमत्तांची माहिती घेण्यासाठी पुण्यातील नोंदणी महानिरीक्षकांना पत्र लिहून मालमत्तांची माहिती मागितली होती.
नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना पुरविली आहे. त्यानुसार मनोरमा खेडकर यांच्या नावे ५ लाख ६० हजार, ४२ लाख २५ हजार, १ लाख ५ हजार अशा तीन मालमत्तांची नोंद असल्याचे सांगितले आहे. या तीनपैकी एका मालमत्तेचे बाजारमूल्य १४ लाख ६५ हजार असताना खरेदीखतामध्ये केवळ १ लाख ५ हजारांचाच उल्लेख करण्यात आला आहे. या तिन्ही मालमत्तांचे एकत्रित मूल्य ४८ लाख ९० हजार रुपये इतके आहे, तर दिलीप खेडकर यांच्या नावे एकूण नऊ मालमत्ता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या सर्व मालमत्तांचे एकूण मूल्य १ कोटी ५६ लाख ९७ हजार ५०० रुपये आहे.
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाने याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविला असून, याप्रकरणी संबंधित विभागाने १० मार्च रोजी सुनावणी निश्चित केली होती. मात्र, सुनावणीस आणखी वेळ द्यावा, अशी मागणी खेडकर कुटुंबीयांकडून करण्यात आली. त्यानुसार पुढील सुनावणी येत्या आठवडाभरात घेतली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. आई-वडिलांच्या नावावर एकूण दोन कोटी रुपयांची मालमत्ता असतानासुद्धा खेडकर हिला नॉन क्रीमिलेअर कसे देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खोट्या कागदपत्रांवरून यूपीएससीनेदेखील तिचे आयएएस पद रद्द केले आहे. सर्वोच्च न्यायालयात पूजा खेडकर हिने जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी (दि. १८) सुनावणी होणार आहे. सरकारी परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता न्यायालय काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
पूजा खेडकर हिच्या नावावरच १७ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. दिलीप खेडकर यांच्या बंगल्याची किंमतच १० कोटींपेक्षा जास्त आहे, तसेच आता अधिकृतरीत्या ही २ कोटी रुपयांची संपत्ती उघड झाली आहे. दिलीप खेडकर हे वर्ग १ अधिकारी होते. असे असतानाही पूजा खेडकरला नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र दिले जाते. याप्रकरणी राज्य सरकारने चौकशीसाठी वेळ न दवडता तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करायला हवा. - विजय कुंभार, माहिती अधिकार कार्यकर्ते, पुणे