भाजप विरोधात राजकीय पक्षांची आंदोलने; म्हणून ‘कलाकार कट्टा’ हटवण्याचा डाव, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 17:04 IST2026-02-13T17:03:49+5:302026-02-13T17:04:47+5:30
भाजपकडून वाहतुकीचा मुद्दा पुढे केला जात असला, तरी याठिकाणी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते भाजपविरोधात आंदोलन करत असतात, अशी त्यांच्याच पक्षातीलच काही लोकांची माहिती

भाजप विरोधात राजकीय पक्षांची आंदोलने; म्हणून ‘कलाकार कट्टा’ हटवण्याचा डाव, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा आरोप
पुणे : गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ येथे भाजपच्या विरोधात विविध राजकीय पक्षांची आंदोलने होतात. या कारणास्तव हा कट्टा इतरत्र हलवण्याचा घाट घातला जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. हा कट्टा भाजपच्याच माजी नगरसेविकेच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे. तसेच कट्ट्यासह शिल्पाच्या उद्घाटनाला भाजपचेच तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहिले होते, हे माहिती असूनसुद्धा भाजपचेच नगरसेवक हा कट्टा हलवायला निघाले आहेत. वाहतुकीला अडथळा हे केवळ निमित्त असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपच्या नगरसेवकांनी या परिसरात वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या कारणावरून महापालिका आयुक्तांना ‘कलाकार कट्टा’ स्थलांतरित करण्यासंबंधी लेखी पत्र दिले आहे. गुडलक चौकातील कॅफेसमोरील मोकळ्या जागेत साकारलेल्या या ‘कलाकार कट्टा’वर चित्रकला, नृत्य आणि चित्रपटाचा संगम निर्माण केला आहे. १० फूट उंचीची तीन धातूची शिल्प बसवली आहेत. हा कलाकार कट्टा कला संस्कृतीचे दर्शन घडवतो. ‘देव आनंद, गुरूदत्त, श्रीराम लागू, डाॅ. जब्बार पटेल, नसीरुद्दीन शाह आणि इतर अनेक कलाकार गुडलक कॅफेमध्ये वारंवार येत असत. याच चौकात कलेबद्दल चर्चा होत असे. ‘कट्टा आणि कलासंगम’ त्यांच्या आठवणी जपण्याच्या दृष्टीने तसेच नवोदित कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हा कट्टा साकारण्यात आला. मात्र हाच कट्टा आता भाजपच्या नगरसेवकांना खुपायला लागला आहे. भाजपच्या विरोधात विविध राजकीय पक्षांची आंदोलने होतात म्हणून हा कट्टा हलवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा कट्ट्यावरही ऐकायला मिळत आहे.
कलाकार कट्टा स्थलांतरित करण्यामागचा भाजपचा खरा चेहरा समोर येत आहे. भाजपकडून वाहतुकीचा मुद्दा पुढे केला जात असला, तरी याठिकाणी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते भाजपविरोधात आंदोलन करत असतात, अशी त्यांच्याच पक्षातीलच काही लोकांकडून आम्हालाही माहिती मिळाली आहे. हीच खंत मनात ठेवून कलाकार कट्टा स्थलांतरित करण्याचा डाव भाजपच्या नगरसेवकांकडून आखला जात आहे. हा प्रश्न केवळ जागेचा नाही, पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीच्या रक्षणासाठी आमचा लढा कायम राहील, अशी माहिती राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.