पोलिसांच्या डोळ्यावर पेपर स्प्रे मारला; मिरचीचे पाणी अंगावर फेकले, ठाण्यात धिंगाणा, सराईत गुन्हेगाराचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:16 IST2025-07-18T17:15:43+5:302025-07-18T17:16:29+5:30

पोलीस पकडायला आल्यावर आरोपीने मिरची पावडर पाण्यात टाकून ते पाणी पोलिसांच्या अंगावर फेकले, त्याच्याजवळील पेपर स्प्रे पोलिसांच्या डोळ्यावर मारला.

Policeman sprayed with pepper spray in his eyes Chilli water thrown on him chaos in the police station criminal glory in the inn | पोलिसांच्या डोळ्यावर पेपर स्प्रे मारला; मिरचीचे पाणी अंगावर फेकले, ठाण्यात धिंगाणा, सराईत गुन्हेगाराचा प्रताप

पोलिसांच्या डोळ्यावर पेपर स्प्रे मारला; मिरचीचे पाणी अंगावर फेकले, ठाण्यात धिंगाणा, सराईत गुन्हेगाराचा प्रताप

पुणे : मकोका कारवाई केलेल्या सराईत गुन्हेगाराचा जामीन झाला. त्यानंतर काही दिवस शांत राहिल्यानंतर, पुन्हा त्याने महिलांची छेड काढण्याचे प्रकार सुरू केले. यामुळे त्याच्यावर दोन गुन्हे सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. या गुन्ह्यांमध्ये पाहिजे आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक त्याच्या घरी गेले असता, नशेत असलेल्या आरोपीने त्यांच्या डोळ्यावर पेपर स्प्रे मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला पकडून हातकडी घालून सहकारनगरपोलिस ठाण्यात आणले असता, त्या नशेखोर गुंडाने हातातील बेड्या ठाणे अंमलदाराच्या काचेवर मारून ती काच फोडली. हा प्रकार शुक्रवारी (दि. १८) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला. ऋषिकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे (२५) असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोंढे हा सराईत गुंड आहे. तळजाई परिसरात दहशत माजवून वाहनांची तोडफोड करणार्या व नागरिकांना हत्याराचा धाक दाखवून लुटणाऱ्या मयूर आरडे व त्याच्या १० साथीदारांवर तत्कालीन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्काची कारवाई केली होती. त्यामध्ये ऋषिकेश ऊर्फ बारक्या लोंढे याचा समावेश होता. दोन वर्षांपूर्वी ही कारवाई करण्यात आली होती. मकोकामध्ये बारक्या लोंढे याला जामीन मिळाल्याने तो सध्या बाहेर होता. बारक्या लोंढे हा दाखल विनयभंगाच्या प्रकरणात पोलिसांना पाहिजे होता. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहकारनगर पोलिस गुन्हेगार तपासात त्याच्या घरी पोहोचले. त्यावेळी तो घरातच सापडला.

आरोपीने मोठ्या प्रमाणात नशेच्या पदार्थाचे सेवन केले होते. पोलिस पकडायला आल्याचे समजताच त्याने मिरची पावडर पाण्यात टाकून ते पाणी पोलिसांच्या अंगावर फेकले. त्याच्याजवळील पेपर स्प्रे पोलिसांच्या डोळ्यावर मारला. असे असतानाही पोलिसांनी त्याला पकडून पहाटे साडेतीनच्या सुमारास सहकारनगर पोलिस ठाण्यात आणले. त्यावेळी तो मोठमोठ्याने शिवीगाळ करत होता. त्यावेळी त्याच्या हातात बेड्या घातल्या होत्या. शिवीगाळ करत त्याने बेड्या घातलेला हात ठाणे अंमलदार यांच्या जवळील काचेवर जोरात मारला. त्यात पोलिस ठाण्याची काच फुटली. यामुळे आरोपीच्या हातालाही काच लागली. ठाणे अंमलदार यांच्या समोरील कॉम्प्युटरदेखील त्याने त्याच हाताने ढकलून देत खाली पाडला.

याबाबत पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गौड यांनी सांगितले की, मोकामध्ये जामीन झालेल्या ऋषिकेश लोंढे हा विनयभंगाच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी होता. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर त्याने पेपर स्प्रे मारला. त्यामुळे पोलिसांच्या डोळ्यांची आग झाली. त्यानंतर त्याने पोलिस ठाण्यातील बेड्या घातलेला हात काचेवर आपटला, त्यामुळे काच फुटली. याप्रकरणी सध्या आरोपीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याने केलेल्या कृत्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Policeman sprayed with pepper spray in his eyes Chilli water thrown on him chaos in the police station criminal glory in the inn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.