Police will call for people for peace in Ayodhya's result | अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शांततेचे आवाहन
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शांततेचे आवाहन

ठळक मुद्देग्रुप अँडमिनला धरले जाणार जबाबदार  :निकालावर सोशल माध्यमांतून कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करु नयेत असे आवाहन

पुणे : अयोध्येतील रामजन्मभूमीच्या संदर्भात येत्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय जाहीर होणार आहे. यावेळी कुठल्याप्रकारची अनुचित घटना घडू नये याकरिता पुणेपोलिसांकडून नागरिकांना शांतता व शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे. पुणे शहराचे पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी याविषयीची अधिक माहिती प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे. 
सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात येणारा निकाल कुठला का असेना मात्र त्या निकालावर सोशल माध्यमांतून कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करु नयेत यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. याबरोबरच कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावर प्रसिध्द होणार नाही याची काळजी घ्यावी, धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने घोषणाबाजी, जल्लोष करु नये तसेच फटाके वाजवु नयेत, मिरवणूका काढु नयेत तसेच निकालासंदर्भात अभिनंदनपर तसेच निषेध व्यक्त करणारे फलक (बँनर्स) लावु नयेत, कोणत्याही प्रकारच्या जातीय दंगलीच्या अनुषंगाने जुने व आक्षेपार्ह व्हीडीओ, फोटो पुन्हा प्रसारित करु नयेत. आक्षेपार्ह व्हीडिओ, फोटो फॉरवर्ड करु नयेत अशा प्रकारचे मेसेज फॉरवर्ड करणा-यांवर पोलिसांकडून वॉच ठेवला जाणार आहे. 
 प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सुचनांचे पालन न केल्यास, कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्यास अथवा जातीय तणाव निर्माण केल्यास अशी व्यक्ती अथवा समुह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. 

* व्हाटसअप ग्रुप अ‍ॅडमिनला सुचना 
 अयोध्या (रामजन्म भुमी)  संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार असुन त्यासंदर्भात कोणतेही प्रक्षोभक विधान अथवा मॅसेज व्हाटस अप ग्रुपवर किंवा सोशल मिडीयावर येणार नाहीत, तसेच सर्व ग्रुप अ‍ॅडमिनने ग्रुपवर कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह मेसेज येणार नाहीत किंवा ते पाठवले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. याबाबत तक्रार आल्यास मेसेज टाकणा-यासह अँडमिनवर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडेल असा कोणताही मजकूर, फोटो, व्हिडीओ, प्रसारित करु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

Web Title: Police will call for people for peace in Ayodhya's result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.