भांडण करणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून पोलिसांनाच लाथाबुक्क्यांनी मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 19:40 IST2025-01-12T19:39:30+5:302025-01-12T19:40:10+5:30

पोलिसांनी त्यांना हटकले असता, संशयितानी आपसात संगनमत करून पोलिसांवर हल्ला चढवला.

Police were beaten with sticks after they tried to disperse those who were fighting. | भांडण करणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून पोलिसांनाच लाथाबुक्क्यांनी मारहाण

भांडण करणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून पोलिसांनाच लाथाबुक्क्यांनी मारहाण

पिंपरी : भांडण करत असलेल्यांना हटकल्याने पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास यमुनानगर, निगडी येथे घडली. 

प्रमोद प्रकाश साखरे (२६, भोंडवे बाग, रावेत), वैभव भाऊसाहेब तुपे (२८, रा. ओटास्कीम, निगडी), अजय बाबासाहेब पोळ (२१, गुरुदत्त कॉलनी, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण कांबळे (नेमणूक : गुन्हे शाखा) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण कांबळे सहकाऱ्यांसोबत निगडी परिसरात गस्त घालत असताना, संशयित आपसात भांडण करत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांना हटकले असता, संशयितानी आपसात संगनमत करून पोलिसांवर हल्ला चढवला. त्यांनी हवालदार कांबळे यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, ''पोलिसांना खूप माज आला आहे,'' असे म्हणत एका पोलिसाचे बोट पिरगळले. 

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे, पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, आणि शत्रुघ्न माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयितांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले असता, त्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. संशयित प्रमोद साखरे आणि वैभव तुपे यांनी भिंतीवर डोके आपटून कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. शिवाय, "तुमच्या सगळ्यांना बघून घेतो, तुमच्या सगळ्यांना कामाला लावतो," अशी धमकी दिली.

Web Title: Police were beaten with sticks after they tried to disperse those who were fighting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.