गडचिरोलीत पोलीस उपनिरीक्षकाच्या बहिणीचा खून करून पळाला; पोलिसांना पुण्यात सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 09:50 IST2025-04-19T09:50:54+5:302025-04-19T09:50:59+5:30

पोलिसांनी केलेल्या तपासात तरुणाने पोलिसांच्या बहिणीच्या मोबाईलवरून काही व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले, त्यावरून पोलिसांचा संशय वाढला

Police Sub-Inspector's sister murdered in Gadchiroli and fled; Police found him in Pune | गडचिरोलीत पोलीस उपनिरीक्षकाच्या बहिणीचा खून करून पळाला; पोलिसांना पुण्यात सापडला

गडचिरोलीत पोलीस उपनिरीक्षकाच्या बहिणीचा खून करून पळाला; पोलिसांना पुण्यात सापडला

पुणे : पोलिस उपनिरीक्षकाच्या बहिणीच्या डोक्यात मारून तिचा खून करून पुण्यात पळून आलेल्या गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी न. ता. वाडी परिसरात जेरबंद केले. विशाल ईश्वर वाळके (४०, रा. सुयोगनगर, नवेगाव, गडचिरोली) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. कल्पना केशव उंदीरवाडे (६४, रा. कल्पना विहार, सुयोगनगर, नवेगाव, ता. जि. गडचिरोली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत श्रेणी पोलिस उपनिरीक्षक मोहन काशीनाथ सोनकुसरे (५७, रा. इंदिरानगर, लांझेडा, जि. गडचिरोली) यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोहन सोनकुसरे हे गडचिरोली पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांची मोठी बहीण कल्पना उंदीरवाडे ही जिल्हा परिषदेमध्ये कक्ष अधिकारी होती. तेथून ती २०१८ मध्ये सेवानिवृत्त झाली होती. तिच्या पतीचे २०२२ मध्ये निधन झाले आहे. घरात ती व तिचा मुलगा उत्कल (२५) हे दोघेच राहतात. १३ एप्रिल रोजी ते दुपारी मुख्यालयात जात असताना त्यांना कल्पना ही घरात पडलेली असून तिच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे समजले. ते तिच्या घरी गेले असताना कल्पना बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. कोणीतरी तिच्या डोक्यात हत्याराने वार करून तिचा खून केला होता. यावेळी उत्कल हा परीक्षेसाठी गेला होता.
गडचिरोली पोलिसांनी तपास करताना त्यांचा भाडेकरू विशाल वाळके याच्याकडे प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला दुपारनंतर पुन्हा बोलावले होते. परंतु, विशाल हा तेथून पळून गेला. पोलिसांनी केलेल्या तपासात विशाल याने कल्पना यांच्या मोबाईलवरून काही व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले. तसेच आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत तो त्यांच्या घरात असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पोलिसांचा विशालवरील संशय वाढला होता. विशाल वाळके याचा सर्वत्र शोध सुरू होता. विशाल वाळके हा शिवाजीनगर येथील नरवीर तानाजी वाडी येथे असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सकाळी विशाल याला पकडले. गडचिरोली पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड व पोलिस उपनिरीक्षक दीपक चव्हाण हे पुण्यात आल्यावर विशाल वाळके याला त्यांच्या हवाली केले.

ही कामगिरी पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, एसीपी साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह पथकाने केली.

Web Title: Police Sub-Inspector's sister murdered in Gadchiroli and fled; Police found him in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.