विधानसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्त्यावर पोलिसांचे संचलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 21:54 IST2019-10-19T21:54:01+5:302019-10-19T21:54:58+5:30
निर्भय आणि मोकळ्या वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचा दाखला..

विधानसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्त्यावर पोलिसांचे संचलन
पुणे : आगामी विधानसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी, आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी सिंहगड रस्ता पोलिसांच्या वतीने शुक्रवारी प्रमुख रस्त्यांवरून 'सशस्त्र रूट मार्च' काढण्यात आला. शुक्रवारी ( दि. १८) सकाळी अकरा वाजल्यापासून सनसिटी येथून संचलनास प्रारंभ झाला. त्यानंतर संतोष हॉल चौक, माणिकबाग, वडगाव बुद्रुक, धायरी, नऱ्हे , तुकाईनगर, तसेच सिंहगड रस्ता आदी परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्ता पोलिसांच्या वतीने संचलन करण्यात आले.
यावेळी सहायक पोलीस आयुक्त पी. डी . राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, बालाजी साळुंखे, हणमंत ननवरे, अर्चना बोधडे, प्रशांत कणसे यांच्यासह सीआयएफएस, सीआरपीएफ, एसआरपीएफ, तसेच पोलीस व होमगार्ड व सशस्त्र जवानांचा सहभाग होता. सिंहगड रस्ता परिसराला छावणीचे रूप आले होते. निर्भय आणि मोकळ्या वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचा दाखला या वेळी देण्यात आला. तसेच सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्ता पोलीस ठाणे हद्दीतील एकूण १९२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.या रूट मार्चने नागरिकांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. यावेळी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी संचलनाचे नेतृत्व केले. संचलनासाठी एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस दिसल्याने बरेच नागरिक आपल्या मोबाईलमधून पोलिसांचे फोटो काढत होते, तर काही जण पोलिसांना 'सॅल्यूट' करत होते.