वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर; तरुणीला पोलिसांनी केली अटक  

By नितीश गोवंडे | Updated: December 27, 2024 19:36 IST2024-12-27T19:36:35+5:302024-12-27T19:36:55+5:30

मेफेटरमाईन सल्फेट या औषधाच्या १६० बाटल्या जप्त करण्यात आल्या.

Police arrest young woman for using painkillers for intoxication | वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर; तरुणीला पोलिसांनी केली अटक  

वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर; तरुणीला पोलिसांनी केली अटक  

पुणे : वेदनाशामक, तसेच भुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. बेकायदा औषधांची विक्री करणाऱ्या एका तरुणीला हडपसर पोलिसांनीअटक केली. तिच्याकडून एक लाख रुपयांच्या मेफेटरमाईन सल्फेट औषधाच्या (टर्मिन) १६० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. अंबिका उर्फ नेहा आनंदसिंह ठाकूर (२६, रा. माळवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलिसांचे पथक गुरुवारी (दि. २६) गस्त घालत होते. त्यावेळी हडपसर भागात राहणारी अंबिका ठाकूर ही वेदनाशामक, तसेच भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे यांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. तिच्याकडून मेफेटरमाईन सल्फेट या औषधाच्या १६० बाटल्या जप्त करण्यात आल्या.

अंबिका ठाकूर हिच्याकडे औषध विक्रीचा परवाना नाही, तसेच तिच्याकडे औषधनिर्मिती अभ्यासक्रमाची (फार्मसी) पदवी नाही. डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधाचा वापर केल्यास दुष्परिणाम होतात, तसेच औषधाचे सेवन करणाऱ्याच्या आरोग्यास गंभीर इजा पोहोचू शकते. ठाकूरला याबाबतची माहिती होती. हडपसर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख, हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, नीलेश किरवे, गायत्री पवार यांनी ही कामगिरी केली.
 
चारशे ते पाचशे रुपयांना विक्री...

अंबिका ठाकूर ही नशा करायची. तिने यापूर्वी व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतले होते. त्यानंतर तिने नशेसाठी औषध विक्री सुरू केली. औषधाच्या बाटलीची ती चारशे ते पाचशे रुपयांना विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधाची विक्री, तसेच सेवन करण्यास बंदी आहे. तिने औषधांच्या बाटल्या कोठून आणल्या, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. यापूर्वी पोलिसांनी नशेसाठी औषधांचा वापर, तसेच विक्रीचे प्रकार उघडकीस आणले आहेत.

Web Title: Police arrest young woman for using painkillers for intoxication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.