मुलींना पोलिसांकडून शिवीगाळ, दमदाटी केल्याचा आरोप; गुन्हा दाखल होणार नाही, पोलिसांचे पत्र समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 18:31 IST2025-08-04T18:29:59+5:302025-08-04T18:31:51+5:30
घटना वस्तुस्थितीवर आधारित दिसून येत नसल्याने जाती आणि अनुसूचित जमाती कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही.

मुलींना पोलिसांकडून शिवीगाळ, दमदाटी केल्याचा आरोप; गुन्हा दाखल होणार नाही, पोलिसांचे पत्र समोर
पुणे: पोलिसांनी कोथरूडमधून तीन तरुणींना ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांनी जातिवाचक अपमानजनक दमदाटी केल्याचा आरोप तरुणींनी केला आहे. या घटनेचा व्हिडीओ संबंधित मुलीने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनुसार संभाजीनगर पोलिस पुण्यात आले होते. त्यानुसार संबंधित मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार रोहित पवार रविवारी रात्री अकराच्या सुमारास पोलिस आयुक्तालयात दाखल झाले. त्यांनी मुलींनी केलेल्या आरोपांबाबत पोलिसांनी कारवाई का केली नाही? याबाबतचा जाब पुण्याचे पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे व परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांना विचारला. यावेळी पोलिसांनी आम्ही कायदेशीर बाबींचा अभ्यास करत होतो, असे उत्तर रोहित पवार यांच्यासह आलेल्या शिष्टमंडळाला दिल्याने उपस्थित जमाव काहीसा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी रात्री उशिरापर्यंत रोहित पवार व पीडित मुली पोलिस आयुक्तालयात ठाण मांडून होते. यावर पोलिस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
आता पोलिसांचे या घटनेबाबत एक पत्र समोर आले आहे. ही घटना वस्तुस्थितीवर आधारित दिसून येत नसल्याने जाती आणि अनुसूचित जमाती कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही. असे पोलिसांकडून जाहीर केलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.