पुणे: शहरातील सहा हजार गृहनिर्माण संस्थांमध्ये पाइप्ड नॅचरल गॅस अर्थात पीएनजीचे वितरण होत असले तरी अद्याप ८० टक्के सदनिकाधारक एलपीजी सिलिंडरचाच वापर करत आहेत. या सदनिकाधारकांनी पीएनजीचा वापर करावा याबाबत आता सहकार विभाग आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) पुढाकार घेतला आहे. त्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात शहरात एमएनजीएलची जोडणी असलेल्या संस्थांमध्ये दोन लाख घरांत पीएनजीचा वापर सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे एनएनजीएलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच यासंदर्भात महत्त्वाची बैठक पार झाली. यावेळी एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, संचालक (वाणिज्य) मेजर शंकर करजगी, बागेश्री मंठाळकर, जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, एमसीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट संघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन उपस्थित होते. युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्या सहा हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये पीएनजीचा वापर केला जात आहे, अशा संस्थांमधील सदनिकाधारकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहन तावरे यांनी केले. शहरात एमएनजीएलचे जाळे विस्तारले असून, उपनिबंधकांनी त्यांच्या हद्दीतील 'एमएनजीएल'ची जोडणी पोहोचलेल्या सर्व संस्थांना पत्र पाठवून शंभर टक्के घरांमध्ये 'पीएनजी'चा वापर सुनिश्चित करण्याचे आवाहन करावे, तसेच पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण सोसायट्या व अपार्टमेंट महासंघानेही जनजागृती करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
पहिल्या टप्प्यात शहरात 'एमएनजीएल'ची जोडणी असलेल्या सोसायट्यांमध्ये दोन लाख घरांमध्ये 'पीएनजी'चा वापर सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे घरटी दोन याप्रमाणे ४ लाख एलपीजी सिलिंडरची बचत होऊन ते वाणिज्यिक-औद्योगिक वापरासाठी उपलब्ध होतील,' असा विश्वास मंठाळकर यांनी व्यक्त केला.
नवीन ग्राहकांना विशेष सवलत
पाइप नॅचरल गॅससाठी नोंदणी करणाऱ्या नवीन ग्राहकांना १ हजार ५५० रुपयांची विशेष सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे नवीन ग्राहकांना पहिले दोन महिने अवघे सहाशेच रुपये बिल येईल. एमएनजीएलचे संकेतस्थळ आणि 'माय एमएनजीएल' ॲपद्वारे ग्राहकांना 'पीएनजी' जोडणीसाठी नोंदणी करता येणार आहे, असे कुमार शंकर यांनी सांगितले.
Web Summary : Despite PNG availability, 80% Pune homes use LPG. Cooperation department and MNGL are launching awareness campaigns to promote PNG usage, aiming for 2 lakh PNG connections initially, saving LPG cylinders.
Web Summary : पीएनजी की उपलब्धता के बावजूद, पुणे के 80% घर एलपीजी का उपयोग करते हैं। पीएनजी उपयोग को बढ़ावा देने के लिए सहकारिता विभाग और एमएनजीएल जागरूकता अभियान शुरू कर रहे हैं, जिसका लक्ष्य शुरू में 2 लाख पीएनजी कनेक्शन जोड़ना है, जिससे एलपीजी सिलेंडर की बचत होगी।