PMPML| बस ट्रॅकिंग व्यवस्थित होण्यासाठी पीएमपी ‘गुगल’सोबत करणार करार
By नितीश गोवंडे | Updated: September 21, 2022 21:10 IST2022-09-21T21:05:33+5:302022-09-21T21:10:02+5:30
पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली...

PMPML| बस ट्रॅकिंग व्यवस्थित होण्यासाठी पीएमपी ‘गुगल’सोबत करणार करार
पुणे : पीएमपीला होणारी तूट पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून मिळावी यासाठी आर्थिक ताळेबंदीचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला संचालक मंडळाकडून मान्यता मिळाली असून, त्यानुसार दोन्ही महापालिका ६०-४० या धोरणानुसार पीएमपीला संचलन सूट देणार आहेत. मंगळवारी (२० सप्टेंबर) पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत या निर्णयासह काही विषय देखील मंजूर करण्यात आले.
पीएमपीला सध्या ७१८ कोटींची तूट होत आहे. यामुळे दोन्ही महापालिकांनी ही तूट भरून काढण्यासाठी आर्थिक ताळेबंदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यासह पीएमपीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांप्रकरणी देखील धोरण प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्या प्रस्तावाला देखील मान्यता मिळाली असून, अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी तर चालक-वाहकांची पाच वर्षांनी आता बदली होणार आहे. या संचालक मंडळाच्या बैठकीवेळी दोन्ही महापालिकांचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, पीएमपीच्या सह व्यवस्थापकीय संचालिका डॉ. चेतना केरूरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
अखेर ‘गुगल’सोबत करार होणार..
शहरात संचलनात असलेल्या पीएमपीचे ट्रॅकिंग व्यवस्थित होण्यासाठी आणि सगळ्या बसचे लाईव्ह लोकेशन पीएमपीच्या कंट्रोल रूमला मिळावे या हेतूने ‘गुगल’सोबत करार करण्यासंबंधी देखील पीएमपी प्रशासनाने प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला देखील संचालक मंडळाने मंगळवारच्या बैठकीत मान्यता दिली असून, लवकरच पीएमपीचे लाईव्ह ट्रॅकिंग सुरू होण्यास मदत मिळणार आहे.