PMPML: पीएमपीला निष्काळजीपणाचा फटका! वेळेत वीजबिल न भरल्याने ४ लाखांचा भुर्दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 11:28 IST2025-09-30T11:28:21+5:302025-09-30T11:28:59+5:30
ठेकेदारांची बिले काढण्यासाठी तत्पर असलेल्या अकाऊंट विभागाला विजेचे बिल भरण्यासाठी वेळ मिळाला नाही का? असा सवाल उपस्थित होतोय

PMPML: पीएमपीला निष्काळजीपणाचा फटका! वेळेत वीजबिल न भरल्याने ४ लाखांचा भुर्दंड
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ऑगस्ट महिन्यातील वीजबिल वेळेत भरले नाही. त्यामुळे वेळेत वीजबिल भरल्यावर चार लाखांची मिळणारी सवलत पीएमपीला मिळाली नाही. यामुळे पीएमपीला चार लाखांचा तोटा झाला. बिल भरण्याची जबाबदारी असलेल्या विद्युत विभागाच्या निष्काळजीपणाचा फटका पीएमपीला बसला आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे मुख्यालय स्वारगेट, १६ डेपो आणि सहा इलेक्ट्रिक डेपोला महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. या सर्व ठिकाणी मिळून पीएमपीला एका महिन्यात साडेचार कोटी इतके वीजबिल येते. हे बिल विशिष्ट मुदतीच्या कालावधीत भरले तर पीएमपीला साधारण साडेतीन ते चार लाख रुपये वीजबिलात सवलत मिळते. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात पीएमपीला साडेचार कोटी इतके वीजबिल आले होते. पण, सवलतीच्या मुदतीमध्ये पीएमपी प्रशासनाला हे बिल भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे पीएमपीला तब्बल चार लाख रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला. हे वीजबिल वेळत भरण्याची जबाबदारी इलेक्ट्रिक विभागाची आहे. परंतु, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका पीएमपीला बसला आहे.
नुकसान वसूल होणार का?
पीएमपीकडे दररोज उत्पन्नातून दोन कोटींपेक्षा जास्त रुपये जमा होतात. परंतु, महिन्याकाठी चार कोटी रुपये आलेले बिल भरण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ठेकेदारांची बिले काढण्यासाठी तत्पर असलेल्या अकाऊंट विभागाला विजेचे बिल भरण्यासाठी वेळ मिळाला नाही का? यामध्ये पीएमपी प्रशासनाचे झालेले नुकसान संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.