PMPML: ‘पीएमपी’चा कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण; ७ हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त, वाहतूक सेवेत अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:58 IST2025-01-20T13:57:43+5:302025-01-20T13:58:29+5:30

दररोज सरासरी ११ लाखांपेक्षा अधिक नागरिक प्रवास करतात, निम्म्याच बस आणि निम्मेच कर्मचारी असल्याने वाहतूक सेवा देण्यात दमछाक होतीये

'PMP' employees face immense workload; More than 7,000 posts vacant, problems in transport services | PMPML: ‘पीएमपी’चा कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण; ७ हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त, वाहतूक सेवेत अडचणी

PMPML: ‘पीएमपी’चा कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण; ७ हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त, वाहतूक सेवेत अडचणी

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये (पीएमपी) एकूण मंजूर कर्मचाऱ्यांपैकी निम्मेच कर्मचारी उपलब्ध आहेत. यामुळे कामाचा प्रचंड ताण पडत असून, वाहतूक सेवा देताना अनेक अडचणी येत आहेत. आकडेवारीनुसार, पीएमपीच्या आस्थापनेवर एकूण १५ हजार ५१९ मंजूर पदांपैकी केवळ ७ हजार ८५१ कर्मचाऱ्यांवर काम सुरू असून, तर ७ हजार ८७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे पीएमपीकडून सुरळीत वाहतूक सेवा देण्यात दमछाक होत आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरएडीच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. यातून दैनंदिन ११ लाखांपेक्षा जास्त पुणेकर प्रवास करतात. प्रवाशांच्या तुलनेत पीएमपीकडे गाड्यांची संख्या कमी असताना प्रवाशांना अनेक अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे पीएमपीकडे निम्मेच कर्मचारी उपलब्ध आहेत. पीएमपीच्या ॲडमिन विभाग, वाहतूक विभाग, वर्कशॉप विभाग यातील क्लर्क, असिस्टंट डेपो मॅनेजर, वायरमन, स्टेनो टायपिस्ट, कॉम्प्युटर अशा अनेक जागांची रिक्त पदे असून ६ वर्षांपासून नियुक्ती करण्यात आली नाही. ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करत नाही, तर प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावरही नकारात्मक परिणाम करत आहे. तर दुसरीकडे चालक, वाहक आणि देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे वेळापत्रक वारंवार विस्कळीत होत आहे. परिणामी, प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

प्रवासी ११ लाख, गाड्या केवळ १९२८

पीएमपीमधून दररोज सरासरी ११ लाखांपेक्षा अधिक नागरिक प्रवास करतात. यासाठी पीएमपीकडे जवळपास चार हजार बसची आवश्यकता आहे. परंतु निम्म्याच बस रस्त्यावर धावत आहेत. प्रवाशांना पुरेल इतकी बसेस ही रस्त्यावर धावत नाही. यामध्ये पीएमपीचे १००३ आणि ठेकेदारांच्या ९२५ बसेस आहेत. प्रवाशांना सेवा वेळेवर न मिळाल्यामुळे प्रवासी खासगी वाहनांना प्राधान्य देत आहेत.

१७ वर्षांपासून पदभरती नाही

पीएमपीमध्ये सन २००७ मध्ये क्लार्क पदाची भरती करण्यात आली होती. त्यानंतर आत्तापर्यंत क्लार्क पदाची भरती करण्यात आली नाही. सन २०२१ मध्ये अनुकंपा तत्त्वावरील २९ कर्मचाऱ्यांची क्लार्क पदावर नेमणूक करण्यात आली आहे. पीएमपीला ५१० क्लार्कची गरज असताना यामध्ये ४८१ जागा रिक्त आहेत. तर असिस्टंट डेपो मॅनेजरच्या ३९ जागांपैकी २१ जागा रिक्त असून, केवळ १८ जागा भरण्यात आल्या आहेत. 

Web Title: 'PMP' employees face immense workload; More than 7,000 posts vacant, problems in transport services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.