पीएमपीच्या वाहकाने अंध विद्यार्थ्याला केली मारहाण, शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 02:25 PM2019-02-17T14:25:45+5:302019-02-17T15:12:16+5:30

पांडुरंग रामचंद्र खरसळे हा विद्यार्थी पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिक्षण घेत आहे. सकाळी सव्वादहा वाजता तो मित्राला भेटण्यासाठी चिंचवडकडे निघाला होता.

PMP conductor beat the blind student in pune | पीएमपीच्या वाहकाने अंध विद्यार्थ्याला केली मारहाण, शिवीगाळ

पीएमपीच्या वाहकाने अंध विद्यार्थ्याला केली मारहाण, शिवीगाळ

googlenewsNext

चिंचवड: पुणे विद्यापीठावरून चिंचवडकडे प्रवास करत असणाऱ्या एका अंध विद्यार्थ्याला पीएमपीएनएलच्या वाहकाने शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी या अंध विद्यार्थ्याने चिंचवड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.


पांडुरंग रामचंद्र खरसळे हा विद्यार्थी पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिक्षण घेत आहे. सकाळी सव्वादहा वाजता तो मित्राला भेटण्यासाठी चिंचवडकडे निघाला होता. हडपसर कडून चिंचवडकडे जाणाऱ्या बसने त्याने प्रवास सुरु केला. त्याच्याकडे असणारा बस पास होस्टेलवर राहिल्याने त्याने तिकिटासाठी वाचकाला दोन हजाराची नोट दिली. वाहकाने सुट्टे पैसे देण्याची मागणी केली. मात्र, सुट्टे पैसे नसल्याने मला उर्वरीत पैसे चिंचवडला बस गेल्यानंतर द्या, असे सांगितले. मात्र, संतप्त झालेल्या वाहकाने तुम्ही अंध व्यक्ती कायमच फुकट फिरत असल्याचे म्हणत अश्लील शब्दात शिवीगाळ केली. या बाबत पांडुरंग याने विचारपूस केली असता या वाहकाने त्याला मारहाण करत तोंडावर दोन चापट लागवल्या.


तुम्हाला तिकीट द्यायचे नसेल तर मी तपासणी करणाऱ्यांकडे दंड भरेल. मात्र तुम्ही मारहाण करू नका, असेही पांडुरंग याने सांगितले. मात्र, या वाहकाने उद्धट वर्तवणूक करत अपशब्द वापरले. झालेला प्रकार पांडुरंगने चिंचवडमधील त्याच्या दृष्टिहीन मित्रास सांगितला. बस चिंचवडला आल्यानंतर प्रशासनाच्या कार्यलयात मारहाण केल्याचा जाब विचारात तक्रार करण्यासाठी दोघेही गेले. मात्र, त्यांनाच इतर उपस्थित कर्मचारीही व्यवस्थित वागणूक देत नव्हते. या वेळी या दोघांनी मित्र परिवाराला घटनास्थळी बोलविले. वाहकाने माफी मागत काढता पाय घेतला. मात्र, पांडुरंगने या बाबत चिंचवड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. चिंचवड पोलिसांनी या घटनेबाबत विचारपूस करत प्रमोद मालुसरे  (बॅच नंबर ४४४७) या वाहकावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक एस.ए.डिगे करीत आहेत.

अश्रू झाले अनावर
पांडुरंग मूळचा हिंगोली जिल्यातील आहे. तो सध्या पुणे येथील सवित्रीबाई फुले विद्यापीठात एम ए चे शिक्षण घेत आहे. त्याने फिजिओथेरपीचा अभ्यासक्रम ही पूर्ण केला आहे. आठ वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने पोरका झालेल्या पांडुरंगाने जिद्द व चिकाटीच्या बळावर उच्च शिक्षण घेतले आहे. आज वाहकाने मारहाण करताना आईचा उच्चार करत अश्लील शिवीगाळ केल्याने त्याला अश्रू अनावर झाले होते. समाजात वावरताना अनेकदा बरे वाईट अनुभव येतात. मात्र, आज वाहकाने शिवीगाळ करीत मारहाण केल्याने त्याचे शब्द पांडुरंग च्या जिव्हारी लागले होते. त्याने आपल्या भावना व्यक्त करताच पोलिसांसह उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

कारवाईची मागणी
एक अंध विद्यार्थ्याला वाहकाकडून मारहाण झाल्याची बातमी समजताच प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाइंड चे कार्यकर्ते, उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेवक शीतल शिंदे, सचिन चिखले, माजी नगरसेवक अनंत कोराळे, खंडूदेव कोठारे, सचिन साकोरे, पंडित खुरंगळे, दत्तू खांबे, अशोक वाळुंज यांच्या सह अनेकांनी पीएमपी वाहकावर कारवाई करण्याची मागणी केली. प्रवासात अंध बांधवाना योग्य वागणूक व सन्मान द्यावा अशी मागणी या वेळी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Web Title: PMP conductor beat the blind student in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.