पीएमपी बस चालक-वाहक कामावर तंबाखू, गुटखा खातात; प्रशासनाने उगारला दंडाचा बडगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 11:11 IST2025-12-06T11:10:45+5:302025-12-06T11:11:00+5:30
बस चालक-वाहक कामावर असताना तंबाखू, गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकतात, अशा तक्रारी नागरिकांनी पीएमपीकडे केल्या होत्या

पीएमपी बस चालक-वाहक कामावर तंबाखू, गुटखा खातात; प्रशासनाने उगारला दंडाचा बडगा
पुणे : बस संचलनासह आगारात तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्या आणि थुंकणाऱ्या चालक-वाहकांसह कर्मचाऱ्यांवर पीएमपी प्रशासनाने दंडाचा बडगा उगारला आहे. पीएमपीची प्रतिमा मलिन होईल, असे कृत्य करू नका, अशा सूचनाही दिल्या आहेत.
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रात पीएमपी बससेवा देते. बस चालक-वाहक कामावर असताना तंबाखू, गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकतात, अशा तक्रारी नागरिकांनी पीएमपीकडे केल्या. याची पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी दखल घेत चालक-वाहकांच्या अशा कृत्याबाबत नाराजी व्यक्त करीत अशा सेवकांवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांमध्ये बस चालविताना तंबाखू, गुटख्याचे सेवन करू नये. सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर थुंकू नये. प्रवाशांच्या आरोग्यास हानीकारक ठरेल असे गैरवर्तन करू नये. पीएमपीची प्रतिमा मलिन होईल असे वागू नये. आगार व बसस्थानक परिसर स्वच्छ ठेवावा आदींचा समावेश आहे. चालक-वाहक, टाइमकिपर, गॅरेज सुपरवायझर, कंट्रोलर, चेकर तसेच आगार व्यवस्थापकांसाठी या सूचना आहेत. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर एक हजार दंडाची कारवाई होणार आहे. वेळप्रसंगी निलंबनाची कारवाईही होणार आहे. आगार व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांची जागृती व प्रबोधन करण्याचे निर्देश देवरे यांनी दिले आहेत.