बावधन – कोथरूड दिसायला छान रहिवाशांसाठी समस्यांचे रान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 13:47 IST2025-11-08T13:46:25+5:302025-11-08T13:47:43+5:30
- प्रशस्त मुख्य रस्ते, मेट्रोची सुविधा वगैरे दिसत असले, तरी सुद्धा येथे राहताना मात्र मूलभूत समस्यांचे आव्हानच नागरिकांसमाेर असल्याचे दिसते.

बावधन – कोथरूड दिसायला छान रहिवाशांसाठी समस्यांचे रान
- विशाल सातपुते
कोथरूड : पुणे शहरातील सर्वात वेगाने विकसित झालेले शहर म्हणून कोथरूड - बावधनचा लौकिक आहे. प्रशस्त मुख्य रस्ते, मेट्रोची सुविधा वगैरे दिसत असले, तरी सुद्धा येथे राहताना मात्र मूलभूत समस्यांचे आव्हानच नागरिकांसमाेर असल्याचे दिसते. विशेषत: कोथरूडमधील दाट लोकवस्ती अन् भुसारी कॉलनी बावधन भागात या समस्या दिसतात. त्यामुळे कोथरूड बाहेरून चकाचक दिसत असले, तरी तेथील रहिवाशांना मात्र पाणी, वीज, खड्डे, ड्रेनेज अशा प्राथमिक सुविधांच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.
पुणे महापालिकेच्या हद्दीतील बावधन–कोथरूड हा, नवा प्रभाग निश्चित करण्यात आला आहे. या प्रभागात बावधन खुर्द, भुसारी कॉलनी, शिंदे नगर, रामनगर, रामकृष्ण परमहंस नगर, माणिक्य नगर, श्री चिंतामणी नगर, गुरू-गणेश नगर, एकलव्य कॉलेज परिसर, सागर कॉलनी, महात्मा सोसायटी, चांदणी चौक, वैदेही एन्क्लेव्ह, वेद भवन, जिजाई नगर, प्रमथेश सोसायटी, इंदिरा शंकर नगरी आदी भागांचा समावेश आहे.
या प्रभागाची लोकसंख्या ८३हजार ३९९ असून, त्यापैकी अनुसूचित जातींची संख्या ६ हजार ३३५ आणि अनुसूचित जमातींची संख्या ६१० आहे.
समस्या अशा
रस्त्यांची दुरवस्था : मुख्य व उपरस्त्यांवर खड्ड्यांची समस्या गंभीर आहे, विशेषतः पावसाळ्यात वाहतूककोंडी वाढते. अंतर्गत रस्ते अरुंद असल्यामुळे येथे दोन मोठ्या गाड्या एकावेळी जाताना अडचण हाेते.
भुसारी बावधन भागात पाणीपुरवठा अपुरा, काही सोसायटीत टँकरने होतो पाणीपुरवठा.
पाणीपुरवठा नियमित नसल्याने नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागते.
बावधन खुर्दमधील उंच भागांमध्ये पाणी दाब कमी असतो.
कचरा व्यवस्थापन निकृष्ट
काही भागांत कचरा संकलन नियमित होत नाही.
ओला-सुक्या कचऱ्याचे विभाजन अपुरे; सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची समस्या.
वाहतूक आणि पार्किंग समस्या...
चांदणी चौक, भुसारी कॉलनी आणि बावधन – भुसारी कॉलनी परिसरातील प्रमुख समस्या.
बावधन व विशेषतः भुसारी कॉलनी परिसर गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकसित झाला असला, तरी अद्याप अनेक नागरी समस्या कायम आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते खालील मुद्दे सर्वाधिक गंभीर आहेत —
वाहनांची गर्दी प्रचंड वाढली आहे.
पार्किंगची सुविधा अपुरी, त्यामुळे रस्त्यांवर बेकायदा पार्किंग वाढते.
पायाभूत सुविधांचा अभाव
पादचारी मार्ग (फुटपाथ) अनेक ठिकाणी नाहीत किंवा तुटलेले आहेत.
सार्वजनिक शौचालये, उद्याने, खुली मैदाने यांची कमतरता.
पावसाचे पाणी साचण्याची समस्या – जलनिस्सारण व्यवस्था अपुरी.
शासकीय सेवांचा अभाव
शाळा व अंगणवाडी केंद्रांमध्ये जागेची कमतरता जाणवते.
पर्यावरणीय समस्या
बांधकामाचा अतिरेक, झाडांची तोड आणि डोंगरकपारीतील अतिक्रमणे वाढली आहेत.
नागरिकांची मागणी :
स्थानिक रहिवासी महापालिकेकडून नियमित रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठ्याची कायमस्वरूपी योजना, स्वच्छता व्यवस्थेचा दर्जा उंचावणे आणि वाहतुकीसाठी ठोस आराखडा तयार करण्याची मागणी करत आहेत.
नागरिक
शास्त्रीनगरपासून कोथरूड डेपो भुसारी कॉलनी हा परिसर कचरा डेपोमुळे, पिण्याचे पाणी अशा अनेक समस्यांमुळे पूर्वी अविकसित व दुर्लक्षित होता. मात्र, जेव्हापासून कचरा डेपो हलविला आणि पिण्याचे पाणी आले तेव्हापासून भुसारी कॉलनी, कोथरूड डेपो पुणे उपनगरातील वेगाने विकसित झालेला भाग झाला आहे.
बावधन गाव तसे आपले गावपण आजही टिकवून आहे. मात्र, कोथरूडमधील घराच्या किमती वाढल्यापासून बावधन हा लोकांना घरे विकत घेण्याचा पर्याय झाला. परिणामी बावधन देखील वेगाने विकसित होत गेले. मनपात समावेश झाल्यावर महापालिकेने सर्व सुविधा देण्यासाठी सुरुवात केली. अर्थात पुणे मनपाला देखील मोठ्या प्रमाणात टॅक्स जमा होऊ लागला. प्रभाग क्रमांक १० नावाने हा भाग ओळखला जातो.
सध्याच्या प्रमुख समस्या
वेगाने विकसित होत असला तरी आरोग्य, शिक्षण, खेळांचे मैदान, महिलांना रोजगार, ज्येष्ठ नागरिकांना विशेष सुविधा नसणे, शासकीय कार्यालयातील कामांमधील दिरंगाई व भ्रष्टाचार, रस्त्यावर चालण्यासाठी फुटपाथ, महिला बचत गटांसाठी कोणतीही बाजारपेठ उपलब्ध नसणे, सार्वजनिक स्वछतागृहांची कमी, महिला स्वछतागृह नसणे, शासकीय दवाखान्यात सर्व आजारांवर उपचार उपलब्ध नसणे अशा अनेक समस्या आजही आहेत.
अनेक राजकीय लोक मतदानावेळी आश्वासन देतात. लोकांच्या मतांवर निवडून येतात. ५ वर्षे निघून जातात. पुन्हा राजकीय मंडळी येतात, आश्वासन देतात. विकास होऊ न होऊ पैशांच्या जीवावर, आमिषे दाखवून, देवदर्शन दाखवून, साड्या, फराळ वाटप, होम मिनिस्टर स्पर्धा, लकी ड्रॉ स्पर्धा घेऊन मतदारांना भुलवले जाते. हेच चक्र वर्षानुवर्षे सुरू आहे . - देशसेवक लक्ष्मण चव्हाण