PMC Election : प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी दोन उपायुक्तांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:37 IST2025-10-08T11:36:55+5:302025-10-08T11:37:55+5:30
निवडणूक प्रशिक्षण कक्षाच्या प्रमुखपदी राजीव नंदकर यांची नियुक्ती

PMC Election : प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याची जबाबदारी दोन उपायुक्तांवर
पुणे : पुणे महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर प्रशासनाकडून आता मतदार यादीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यात प्रभागनिहाय मतदार यादी तयार करणे, मतदार यादी फोडणे, ती अंतिम करून सही शिक्क्यासह निवडणूक शाखेकडे सादर करणे आदीची जबाबदारी दोन महापालिका उपायुक्तांवर दिली आहे. त्यात उपायुक्त रवी पवार आणि निखिल मोरे यांचा समावेश आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘निवडणूक प्रशिक्षण कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करणे, मतदान केंद्रांची आखणी, मतदान यंत्र वापरण्याचे हाताळणे, उमेदवारी अर्ज प्रक्रिया, निकाल प्रक्रिया आदीचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रशिक्षण कक्षाचे प्रमुख म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा यशदाचे सहयोगी प्राध्यापक राजीव नंदकर यांची नियुक्ती केली आहे. प्रशासन अधिकारी संगीता कोकाटे, महापालिकेच्या प्रशिक्षण प्रबोधिनीचे उप अधीक्षक संजय काळे यांची सहाय्यक कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ४१ प्रभागांची विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्तांना नोडल ऑफिसर म्हणून काम करून त्यांनी मतदार यादी विभागणीचे करवून घ्यावे लागणार आहे. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या सुमारे ५ हजार असणार आहे. त्यामुळे विविध जबाबदाऱ्यांचे विक्रेंदीकरण करून ही कामे वेळेत व व्यवस्थित पार पाडली जावीत यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. उपायुक्त रवी पवार यांच्याकडे प्रभाग क्रमांक १ ते १२, २५ आणि २७ ते ३५ अशा २२ प्रभागांची जबाबदारी दिली आहे. निखिल मोरे यांच्याकडे प्रभाग क्रमांक १३ ते २४, २६ आणि ३६ ते ४१ अशा १९ प्रभागांची जबाबदारी दिली आहे.