PMC Election : महापालिका ‘मविआ’ म्हणून लढवणार? पुण्यात उद्धव ठाकरेंचे थेट वक्तव्य…
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 19:26 IST2025-10-04T19:26:20+5:302025-10-04T19:26:38+5:30
ठाकरे म्हणाले, फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्री खुलेआम भ्रष्टाचार करत आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही पुराव्यानिशी काही मंत्र्यांची प्रकरणे उघडकीस आणली.

PMC Election : महापालिका ‘मविआ’ म्हणून लढवणार? पुण्यात उद्धव ठाकरेंचे थेट वक्तव्य…
पुणे : अनेक वर्षांनंतर महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या बहुमतातील सरकार सत्तेवर आहे. त्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या मागे पाशवी बहुमत आणि केंद्र सरकार असतानाही, भ्रष्टाचारामुळे मुख्यमंत्री हतबल आहेत. अधिकाऱ्यांवर कारवाई होते, पण भ्रष्टाचारी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढले जात नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात शनिवारी वार्तालापप्रसंगी केली. ठाकरे म्हणाले, फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्री खुलेआम भ्रष्टाचार करत आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनात आम्ही पुराव्यानिशी काही मंत्र्यांची प्रकरणे उघडकीस आणली. अधिकाऱ्यांना अटक होते. पण ज्यांच्या खोलीमध्ये पैशांच्या बॅगा दिसतात, ज्यांचे डान्स बार आहेत, त्या मंत्र्यांवर कारवाई होत नाही.
आपल्या देशाला आता पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची गरज आहे. कारण, ते देशाचे नव्हे तर एका पक्षाचे आहेत. जेव्हा आम्ही भाजपसोबत होतो, तेव्हा कडवट हिंदुत्ववादी होतो. त्यांच्यापासून दूर गेलो तर आम्ही हिंदुत्व सोडले. हे म्हणजे भाजपसोबत असल्यावर अमर प्रेम आणि त्यांना सोडल्यावर लव्ह जिहाद. आज चंद्राबाबू नायडू, नितीशकुमार भाजपसोबत आहेत, मग ते हिंदुत्ववादी आहेत का, भाजपमधील मुस्लिम नेते हिंदुत्ववादी आहेत का, असा सवालही ठाकरे यांनी केला.
अनेक वर्षांनंतर आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो आहोत. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहे. आम्ही रोज उठून एकत्र आहोत, हे सांगायची गरज नाही. निवडणूक आल्यावर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. भरभरून देऊनही ज्यांनी गद्दारी केली, त्या नमक हरामांना मी उत्तर देत नाही. ज्यांनी पक्ष, निशाणी व बाप चोरला त्यांचे निवडणुकीतील मेरिट कसले तपासायचे? पुरामुळे उभे पीक वाहून गेल्यानंतर, जसा शेतकरी मेहनतीच्या बळावर पुन्हा उभा राहतो, तसा मीही पुन्हा पक्ष उभा करेन. मला केवळ माझा पक्ष बांधायचा नाही तर पक्षासोबत राज्य व देश बांधायचा आहे, असेही ठाकरे म्हणाले.
ठाकरे म्हणाले, “ मी मुख्यमंत्री असताना कोरोना काळात न मागता शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आता अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, तरीही त्याला मदत केली जात नाही. अद्यापही केंद्राचे पथक पाहणीसाठी राज्यात आले नाही. सरकारला केवळ हिंदू-मुस्लिम वाद पेटवण्यात रस आहे. सगळी शहरे बिल्डरांची माहेर घरे झाली आहेत. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला हानी पोहोचवली जात आहे.”
स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊनच निर्णय
आतापर्यंतच्या आम्ही लोकसभा आणि विधानसभा महाविकास आघाडी म्हणून लढलो. आता महापालिकेच्या निवडणुकाही आघाडीच्या माध्यमातून लढण्यास हरकत नाही. पण तिन्ही पक्षांना त्यांचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. निवडणूक जवळ आल्यावर आम्ही चर्चा करू. मात्र ही निवडणूक स्थानिक असल्याने स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेऊ. बिहार निवडणुकीच्या पाश्वभूमीवर केंद्र सरकारने प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात १० हजार रुपये जमा केले आहेत. काँग्रेसने तेथील म चोरी समोर आणली आहे. तेथे शिवसेना पायात पाय घालणार नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.