PMC Election : पाच वर्षापूर्वी केली होती अटक अन् आता आमदारांची रॅली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:47 IST2025-10-09T10:46:12+5:302025-10-09T10:47:24+5:30
संघर्ष दिवस म्हणून परिसरात केली पोस्टर बाजी; पाण्याच्या प्रश्नावरून झाली होती अटक; जुने प्रकरण उकरून काढत शिळ्या कढील ऊत

PMC Election : पाच वर्षापूर्वी केली होती अटक अन् आता आमदारांची रॅली
पुणे - नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून पाठवले असताना महानगरपालिकेच्या निधीतून लोकांची कामे करणे अपेक्षित असते आणि ते कर्तव्यदेखील असते. परंतु, त्यावेळचे माजी आमदार व सध्याचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांनी सध्या येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर पाच वर्षापूर्वी अटक झाल्याचा गवगवा करत पोस्टरबाजी करत माजी नगरसेवक व स्थानिकांना सोबत घेत स्टंटबाजी केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
पाच वर्षापूर्वी म्हणजेच ५ ऑक्टोबर २०२० ला पाणी प्रश्नासाठी आंदोलन करत असताना सध्याचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर व पाच नगरसेवकांना अटक करण्यात आली होती. त्याला नुकतेच पाच वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त कात्रज कोंढवा व इतर परिसरामध्ये या संघर्ष रॅलीचे ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. या रॅलीमुळे सरकारी यंत्रणेवर ताण निर्माण झाला. रविवार असताना नागरिकांना रॅलीमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.
एकीकडे कात्रज कोंढवा रोड कात्रज उड्डाणपूल व अनेक विकासकामे आमदारांमुळे झाले असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अनेक वर्षापासून कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाची प्रतिक्षा सुरु आहे.
ट्रिपल सीटवर कारवाई पोलिस करणार का?
संघर्ष रॅलीत दुचाकी चालकांनी सायलेन्सरचा आवाज करत, बुलेटचे फटाके फोडून स्टंटबाजीदेखील केली. यामुळे रॅली मार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. सर्वसामान्यांना त्रास झाला. अनेक दुचाकी ट्रिपल सीट चालविली गेली, त्यावर पोलिस कारवाई करणार का, असा प्रश्न आहे.
त्या माणसांच्या बळीची जबाबदारी कोणाची ?
कात्रज-कोंढवा रोड पूर्णत्वाकडे नाही? तसेच हजारो नागरिकांचा बळी यामध्ये गेला आहे. याची जबाबदारी मात्र लोकप्रतिनिधी घेणार का? असा असा संतप्त सवाल विरोधक विचारत आहेत.