पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, उद्धवसेना - मनसे, शिंदेसेना या पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर जाहीर सभांतून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडून राजकीय कलगीतुरा रंगला होता. गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेला हा जाहीर प्रचार संपला असून, आता छुपा प्रचार सुरू झाला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशीची रात्र ही ‘कत्तल की रात’ असून, पैशांचे वाटप मोठ्या प्रमाणावर होऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांना खडा पहारा द्यावा लागणार आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे. प्रभाग क्रमांक ३५ मधील भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता निवडणूक १६३ जागांसाठी होत आहे. पुणे पालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढवत आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेची युती झाली नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. काँग्रेस व उद्धवसेना - मनसे हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. या सभेने भाजपने प्रचाराची सांगता केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळपासून ‘रोड शो’द्वारे प्रचार केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रचाराचा समारोप केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवसभर विविध प्रभागांमध्ये फिरून उमेदवारांचा प्रचार केला. काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या शहराध्यक्षांनी पत्रकार परिषद घेत प्रचाराचा समारोप केला.
गेल्या पंधरा दिवसांत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभा आणि दुचाकी रॅली झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांशी संवाद साधला. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात ठाण मांडून होते. अजित पवार यांनी जाहीर सभा, दुचाकी रॅली, रोड शो करत पक्षाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रचार केला.
काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे तर उद्धवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रचारात उतरले होते. शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, भरत गोगावले, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे प्रचारात सहभागी झाल्या होत्या. या जाहीर सभांमधून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडून प्रचाराची राळ उडाली होती. या निवडणुकीसाठी मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर प्रचार संपला. त्यामुळे प्रचाराच्या तोफा थंडावल्या.
‘कत्तल की रात’ टाळण्यासाठी कार्यकर्ते दक्ष
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला जाहीर प्रचार संपला असून, आता छुपा प्रचार सुरू झाला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशीची रात्र ही ‘कत्तल की रात’ असते. या दिवशी पैशाचे वाटप होण्याची दाट शक्यता असते. विशेष करून झोपडपट्टी भागाकडे विशेष लक्ष असते. पैशांचे वाटप होऊ नये यासाठी आपल्या परिसरात रात्री-अपरात्री येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांना खडा पहारा द्यावा लागणार आहे.
सोशल मीडियावरील प्रचार जोरात
महापालिका निवडणुकीसाठी जाहीर प्रचार संपला असला तरी साेशल मीडियावर मतदानाच्या शेवटच्या क्षणांपर्यंत कार्यकर्ते प्रचार करतात. त्यामुळे सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपाच्या पोस्ट झळकत आहेत.
Web Summary : Pune's election sees campaigning shift underground after a fiery public phase. With the 'night of slaughter' looming, parties brace for potential vote-buying. Vigilance is heightened to prevent illegal cash distribution as the election nears.
Web Summary : पुणे चुनाव में प्रचार का सार्वजनिक चरण समाप्त होने के बाद गुप्त अभियान शुरू हो गया है। 'कत्ल की रात' के साथ, पार्टियां संभावित वोट-खरीदने के लिए तैयार हैं। चुनाव नजदीक आते ही अवैध नकदी वितरण को रोकने के लिए सतर्कता बढ़ाई गई है।