पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पक्षांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा मोफत करण्याची घोषणा जाहीरनाम्यात केली आहे. परंतु पीएमपीची कमकुवत आर्थिक बाजू पाहता मोफत प्रवासाचा भार सर्वसामान्य पुणेकरांवर पडणार आहे. दुसरीकडे २०२५-२६ या वर्षात एकूण ९४८ कोटी ५० लाख ६० हजार रुपयांची संचालन तूट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मते मिळविण्यासाठी प्रलोभन करून पीएमपी मोफत देण्याची घाेषणा केली जात असली तरी ती देणार कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) उत्पन्न वाढीसाठी जून महिन्यात तिकीट दरवाढ केली. गेल्या दोन महिन्यांपूर्वी पीएमपीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली, ज्यामध्ये पीएमपीच्या आर्थिक ताळेबंदाचा आढावा घेतला गेला. त्यात २०२५-२६ आर्थिक वर्षात खर्च व उत्पन्नावरून संचालन तूट एकूण ९४८ कोटी ५० लाख ६० हजार इतका होणार आहे. गेल्या वर्षी पीएमपीला उत्पन्नात घट झाली, तरीही ६४१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. खर्च व उत्पन्न यांचा ताळमेळ बघितल्यास, २०२४-२५ मध्ये संचालन तूट ८८५ कोटी रुपये होती. त्यामुळे या संचालन तूट भरपाईसाठी तिकीट दरात ३० टक्के वाढ करण्यात आली आहे. मात्र, तिकीट दरवाढीनंतर प्रवासी संख्येत घट नोंदवण्यात आली आहे. तरीही तिकिटातून मिळणारे उत्पन्न वाढले असून, पीएमपीला तिकिटातून प्रतिदिन सुमारे दोन कोटी ४० लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. मात्र, खर्च वाढत असल्याने संचालन तूट वाढत असल्याचे दिसून आले आहे. आता मोफत प्रवास केल्यावर पूर्ण भार दोन्ही महापालिकेवर पडणार आहे.
९४८ कोटी संचालन तूट होण्याचा अंदाज
पीएमपीला यंदा अपेक्षित उत्पन्न ७९८ कोटी ५० लाख रुपये असून, अपेक्षित खर्च १,७४७ कोटी १ लाख रुपये आहे. त्यामुळे दैनंदिन संचालनासाठी अतिरिक्त निधीची गरज भासणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका पीएमपीला दरवर्षी संचालन तूट मदत करतात. वर्ष २०२४-२५ मध्ये ८८५ कोटी संचलन तूट देण्यात आली होती. आता २०२५-२६ मध्ये ९४८ कोटींवर जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. निवडणुकीच्या काळात मोफत प्रवास देणार असल्याचे घोषणा काही पक्षांनी केली आहे. ते झाले तर पीएमपीचे उत्पन्न वाढणार कसे ? हा प्रश्न आहे.
२०२५-२६ मधील अपेक्षित उत्पन्न, खर्च आणि संचालन तूट
- अपेक्षित उत्पन्न : ७९८ कोटी ५० लाख रुपये- अपेक्षित खर्च : १७४७ कोटी १ लाख रुपये- अपेक्षित संचालन तूट : ९४८ कोटी ५० लाख रुपये
विविध पक्षांकडून दिलेली आश्वासने
-भाजपने ७५ वर्षांवरील सर्वांना पीएमपीचा प्रवास मोफत.-काँग्रेसने जाहीरनाम्यात महिलांना पीएमपीचा प्रवास मोफत.-उद्धवसेना आणि मनसे ज्येष्ठ आणि महिलांना मोफत पीएमपी.-राष्ट्रवादी काँग्रेसने मेट्रो, पीएमपी माेफत.
Web Summary : Parties promise free PMP travel in Pune elections, but the financially weak transport body faces a huge deficit. How will they deliver?
Web Summary : पुणे चुनावों में पार्टियों ने मुफ्त पीएमपी यात्रा का वादा किया, लेकिन आर्थिक रूप से कमजोर परिवहन निकाय को भारी घाटा है। वे इसे कैसे पूरा करेंगे?