पीएम किसान बनावट ॲप करते शेतकऱ्यांचा घात; अनेक शेतकऱ्यांचे मोबाइल हॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 10:03 IST2025-01-15T09:59:13+5:302025-01-15T10:03:13+5:30
काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी हे ॲप ब्लॉक करण्यासाठी रिपाेर्टही केल्याचे समोर आले आहे.

पीएम किसान बनावट ॲप करते शेतकऱ्यांचा घात; अनेक शेतकऱ्यांचे मोबाइल हॅक
- बापू नवले
केडगाव : पीएम किसान योजनांसारख्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी बनावट ॲप तयार करून काही शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा हॅकरने गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वी गलांडवाडी (ता. दौंड) येथील एका प्रतिष्ठित व्यक्तीला पीएम किसान योजनेसंबंधित मेसेज आला होता. शेतकऱ्यांसाठी हा उपयुक्त असल्याने त्यांनी तो पुढे इतरांना पाठवून दिला. मात्र, हा मेसेज पाहून अनेकांनी तेथे दिलेल्या सूचनांनुसार ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर अनेकांना हजारो रुपयांचा चुना लागला. काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी हे ॲप ब्लॉक करण्यासाठी रिपाेर्टही केल्याचे समोर आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मोबाइलवर बनावट ॲप लिंक पाठवली जाते आणि त्यावरून मोबाइलवर ताबा मिळवला जातो. ही पद्धत गेल्या सहा महिन्यांपासून व्हाॅट्सअप ग्रुप वर हॅक झालेल्या मोबाइलच्या मदतीने हॅकर ग्रुप वर पाठवायला लागले आहेत. तुम्ही ज्या ग्रुपमध्ये असाल, तुम्ही ज्या समुदायाला जोडले गेले आहात, त्या अनुसार ग्रुप तयार केला जातो. मोबाइल धारकांच्या विविध ग्रुपला मेसेज पाठवून हे ॲप मोफत असून, माहितीस्तव आहे, असे मेसेज केले जातात. पीएम किसान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांसारख्या ग्रामीण भागातील लोकांना आकर्षित करणाऱ्या योजनांचे नाव त्या ॲपला दिले जाते. स्वाभाविकच योजनांना बळी पडणारे नागरिक तत्काळ हे ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करतात व आपल्या मोबाइलचा सर्व ताबा हॅकरच्या हातात देऊन टाकतात. त्यानंतर हॅकर एक तर त्यांना ब्लॅकमेल करतो किंवा मोबाइलच्या फोन पे, गुगल पे त्याचबरोबर नेट बँकिंगच्या वेगवेगळ्या ॲपवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करून बँक खाते रिकामी करून टाकतो.
काही दिवसांपूर्वी गलांडवाडी (ता. दौंड) येथील एका प्रतिष्ठित व्यक्तीला पीएम किसान योजनेसंबंधित मेसेज आला होता. शेतकऱ्यांसाठी हा उपयुक्त असल्याने त्यांनी तो पुढे इतरांना पाठवून दिला. मात्र, हा मेसेज पाहून अनेकांनी तेथे दिलेल्या सूचनानुसार ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर अनेकांना हजारो रुपयांचा चुना लागला. काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी हे ॲप ब्लॉक करण्यासाठी रिपाेर्टही केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत, मात्र कुठल्याही प्रकारची दाद नागरिकांना मिळत नाही.
नागरिकांनी सुरक्षा सेटिंग सर्व एप्लीकेशनला दिलेल्या असतात. त्याप्रमाणे आपला मोबाइल व सर्व ॲप्लिकेशन सुरक्षित करून घ्यावेत. अनोळखी कॉल किंवा मेसेजला नागरिकांनी उत्तरे देऊ नयेत. - नारायण देशमुख, पोलिस निरीक्षक यवत