शरद मोहोळ खून प्रकरणाचा बदला घेण्याचा कट उधळला; ओंकार मोरेला पुणे गुन्हे शाखेची अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:27 IST2025-05-20T13:27:04+5:302025-05-20T13:27:53+5:30

शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्याचा कट आरोपींनी रचला होता, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली होती, आज तिसऱ्याला अटक करण्यात आली

Plot to take revenge for Sharad Mohol murder case foiled Omkar More arrested by Pune Crime Branch | शरद मोहोळ खून प्रकरणाचा बदला घेण्याचा कट उधळला; ओंकार मोरेला पुणे गुन्हे शाखेची अटक

शरद मोहोळ खून प्रकरणाचा बदला घेण्याचा कट उधळला; ओंकार मोरेला पुणे गुन्हे शाखेची अटक

किरण शिंदे 

पुणे: गुंड शरद मोहोळ यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कट रचणाऱ्या आरोपीला पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. ओंकार सचिन मोरे (रा. पुणे) असे अटक आरोपीचे नाव असून, तो याआधी दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार होता.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पोलिस अंमलदार उज्वल मोकाशी आणि शंकर कुंभार यांना खबऱ्याकडून आरोपीविषयी माहिती मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखा २ च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून सोमवारी रात्री अटक केली. अटकेवेळी त्याच्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले. दरम्यान शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कट रचल्याप्रकरणी याआधी शरद मालपोटे आणि संदेश कडू यांना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणातील हा तिसरा अटक केलेला आरोपी आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असून, आणखी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा ५ जानेवारी २०२४ रोजी गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. कोथरूड येथील सुतारदरा भागात शरद मोहोळ याच्या घराजवळच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेला वर्ष उलटून गेले. त्यामुळे वर्ष होण्याच्या आता शरद मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्याचा कट आरोपींनी रचला होता. मात्र गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेव्हा शरद मालपोटे आणि संदेश कडू या दोघांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूलही जप्त केले होते. तर यातील आणखी काही आरोपी फरार होते. त्यात ओंकार मोरेचा समावेश होता. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सपोनी आशिष कवठेकर कर्मचारी संजय जाधव, शंकर नेवसे, अमोल सरडे, निखिल जाधव यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी केली.

Web Title: Plot to take revenge for Sharad Mohol murder case foiled Omkar More arrested by Pune Crime Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.