पुण्यात लोहगाव येथे विमानात बॉम्ब; अफवेने विमानतळावर उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 09:44 PM2021-10-08T21:44:43+5:302021-10-08T21:44:49+5:30

संगणक अभियंत्याने विमानात बॉम्ब ठेवण्याची अफवा पसरवली

Plane bomb at Lohgaon in Pune; Rumors abound at the airport | पुण्यात लोहगाव येथे विमानात बॉम्ब; अफवेने विमानतळावर उडाली खळबळ

पुण्यात लोहगाव येथे विमानात बॉम्ब; अफवेने विमानतळावर उडाली खळबळ

googlenewsNext
ठळक मुद्देरांचीला निघालेल्या विमान उड्डाणास तीन तासांचा झाला विलंब

पुणे: पत्नीला विमानाचे तिकिट अधिकृत करण्यास विमान कंपनीने नकार दिल्यानंतर संतापलेल्या संगणक अभियंत्याने विमानात बॉम्ब ठेवण्याची अफवा पसरवली. या अफवेमुळे विमानतळावर एकच खळबळ उडाली. रांचीला निघालेल्या विमान उड्डाणास तीन तासांचा विलंब झाला.  त्याच्या या कृत्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली.

ॠषीकेश सावंत (वय २८, रा. बाणेर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सावंत एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहे. शुक्रवारी (८ऑक्टोबर) सकाळी सावंत त्याच्या पत्नीला लोहगाव विमानतळावर सोडण्यासाठी गेला होता. त्याची पत्नी १६ ऑक्टोबरला पुण्यात परतणार होती. धावपट्टीच्या कामामुळे १६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान लोहगाव विमानतळावरून देशात तसेच परदेशात जाणारी विमान उड्डाणे बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे सावंत लोहगाव विमानतळावर विमान कंपनीच्या कार्यालयात गेला आणि त्याने १५ ऑक्टोबरचे तिकिट अधिकृत करून देण्याची मागणी केली. विमान कंपनीने नकार दिल्यानंतर सावंत संतापला आणि त्याने विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा पसरवली. त्यानंतर त्वरीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे  (सीआरपीएफ) पथक, पोलीस तसेच बॉम्ब शोधक नाशक पथकाने विमानतळाची तपासणी सुरू केली. रांचीला निघालेल्या विमानाचे उड्डाण थांबविण्यात आले. विमानाची तपासणी करण्यात आली.

सावंतकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत सावंतने विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवल्याची कबुली दिली. पत्नीला रांचीहून विमान प्रवासाचे परतीचे तिकिट न दिल्याने त्याने अफवा पसरविण्याचे कृत्य केले,  सावंतला अमली पदार्थांचे सेवन करण्याचे व्यसन होते. गेल्या काही दिवसांपासून त्याची मानसिक स्थितीही ठिक नसल्याचे असे विमानतळ पोलिसांनी  सांगितले.

Web Title: Plane bomb at Lohgaon in Pune; Rumors abound at the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.