जमिनीवर बसून अभ्यास, खेळाचे मैदान अपुरे, उंदीर-घुशींसह डासांचा त्रास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:27 IST2025-10-01T13:18:14+5:302025-10-01T13:27:12+5:30
- इंद्रायणीनगरच्या वैष्णोमाता शाळेत मूलभूत सुविधांची वानवा : जागतिक पातळीवर गौरवलेल्या विद्यामंदिराकडे महापालिकेचे दुर्लक्ष; नवीन सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, प्रशस्त ग्रंथालयाची वानवा

जमिनीवर बसून अभ्यास, खेळाचे मैदान अपुरे, उंदीर-घुशींसह डासांचा त्रास
- गोविंद बर्गे
पिंपरी : भोसरीतील इंद्रायणीनगर येथील श्री वैष्णोमाता प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थी कठीण परिस्थितीत शिक्षण घेत आहेत. महापालिकेच्या या शाळेने जागतिक पातळीवर ‘कूलेस्ट प्रोजेक्ट’ स्पर्धेत देशात अव्वल स्थान मिळविले असले तरी प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून अभ्यास करावा लागतो. वर्गांतील गर्दीमुळे गोंगाट होतो. पत्र्याच्या वर्गखोल्यांमुळे उन्हाळ्यात उकाडा वाढतो, तर पावसाळ्यात पाणी गळतीचा त्रास कायम असतो.
या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून पटसंख्या ६६० आहे. पाच बालवर्गांत १२० विद्यार्थी असल्याने एकूण ७८० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. शिक्षकांची संख्या १६ असून पाच कर्मचारी आहेत. मात्र, भौतिक सुविधांचा अभाव आहे. शाळेस नवीन सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, प्रशस्त ग्रंथालय, पुरेसे खेळाचे मैदान नाही.
शाळेच्या मैदानाची स्थिती दयनीय आहे. एका वर्गातील विद्यार्थी मैदानात आले तरी तेथे गर्दी होते. मैदानातील घसरगुंडीला मोठे छिद्र पडले आहे. तिचा वापर मुलांच्या दृष्टीने धोकादायक ठरतो. मैदानातील विद्युत खांबामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह कायम आहे. जागेअभावी एकत्रित प्रार्थना वा सांस्कृतिक कार्यक्रम घेता येत नाहीत.
दोन शाळा ‘पीएम श्री’; पण...
महापालिकेच्या थेरगाव येथील माध्यमिक विद्यालय आणि चिखलीच्या म्हेत्रेवाडीतील पीसीएमसी पब्लिक स्कूल क्र. ९२ या शाळांचा समावेश ‘पीएम श्री’ योजनेत आहे. या दोन्ही शाळांना केंद्राकडून प्रत्येकी एक कोटी ७४ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. या माध्यमातून भौतिक व पायाभूत सुविधांसह उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वसमावेशक शाळा म्हणून विकसित केल्या जात आहेत. दुसरीकडे मात्र जागतिक पातळीवर गौरविलेल्या महापलिकेच्या वैष्णोमाता प्राथमिक विद्यामंदिराकडे दुर्लक्ष होत आहे.
वैष्णोमाता शाळेतील भौतिक सुविधांविषयी प्राप्त तक्रारींबाबत स्थापत्य विभागाकडे प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल. तसेच शाळेतील गैरसोयी दूर केल्या जातील. - किरणकुमार मोरे, सहायक आयुक्त, महापालिका
शाळेत अनेक अडचणी असूनही शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. वाचनालय, प्रश्नमंजूषा, कविता लेखन, हार्मोनियम, लेझीम, ढोल-ताशा मार्गदर्शन, शिष्यवृत्ती परीक्षा तयारी आदी उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. - वंदना इन्नाणी, मुख्याध्यापिका
शाळेची इमारत योग्य का अयोग्य, याबाबत महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. शहर अभियंत्यांनी पाहणी करावी, ही इमारत कधी पडेल याची तारीखसुद्धा जाहीर करावी, म्हणजे आमच्या मुलांना धोका होणार नाही. - ॲड. प्रभाकर तावरे-पाटील, पालक