मुळा-मुठा नदी सापडली जलपर्णीच्या विळख्यात; दौंड-हवेलीतील नागरिकांसह जनावरांना आरोग्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 13:34 IST2026-02-24T13:32:30+5:302026-02-24T13:34:47+5:30

- देलवडी ते नांदूरपर्यंत डासांचा त्रास; दूध उत्पादनात घट, दरवर्षीची समस्या कायमस्वरूपी, नदीच्या पाण्यावर जणू हिरवेगार मैदान तयार झाल्याचा भास

pimpri chinchwad mula mutha river inundated with waterfowl; Mosquito infestation poses a threat to the health of citizens and animals | मुळा-मुठा नदी सापडली जलपर्णीच्या विळख्यात; दौंड-हवेलीतील नागरिकांसह जनावरांना आरोग्याचा धोका

मुळा-मुठा नदी सापडली जलपर्णीच्या विळख्यात; दौंड-हवेलीतील नागरिकांसह जनावरांना आरोग्याचा धोका

राहू : दौंड व हवेली तालुक्यांतील अनेक गावांसाठी वरदान ठरलेली मुळा-मुठा नदी सध्या जलपर्णीच्या विळख्यात सापडली आहे. अल्पावधीतच बेसुमार वाढणाऱ्या जलपर्णीमुळे नदीपात्र हिरव्या चादरीने झाकल्यासारखे दिसत असून नागरिक तसेच जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही गंभीर समस्या बनली आहे. दरवर्षी उद्भवणारी ही समस्या आता कायमस्वरूपी स्वरूप धारण करत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

दरवर्षीप्रमाणे दिवाळीनंतर पाणी साठवण्यासाठी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर ढापे टाकून पाणी अडवले जाते. पाणी साठवण्यास सुरुवात होताच नदीत जलपर्णीची झपाट्याने वाढ सुरू होते. काही दिवसांतच पाण्यावर घट्ट थर निर्माण होतो. या थरावरून मच्छीमार जीव धोक्यात घालून मासेमारी करताना दिसतात, तर काही जनावरे जलपर्णी खाण्यासाठी थेट नदीपात्रात उतरतात.

सध्या नदीच्या पाण्यावर जणू हिरवेगार मैदान तयार झाल्याचा भास होत आहे. मात्र, काही दिवसांनी ही जलपर्णी कुजते आणि परिसरात डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होते. गतवर्षी देलवडी, वाळकी, पिंपळगाव, राहू, दहिटणे, मिरवडी, खामगाव, नांदूर आदी गावांत डासांच्या प्रादुर्भावामुळे काही जनावरे मृत्युमुखी पडली होती. दुधाच्या उत्पादनातही लक्षणीय घट झाल्याची माहिती दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. डासांच्या वाढत्या संख्येमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावरही परिणाम झाला होता.

दरवर्षी हीच परिस्थिती उद्भवत असल्याने वाढत्या जलपर्णीवर वेळीच नियंत्रण मिळवून तिचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दहिटणे, मिरवडी, पिंपळगाव, राहू, वाळकी, देलवडी, पारगाव, खामगाव या नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे. 

मुळा-मुठा नदीवरील जलपर्णीमुळे नागरिक व जनावरांच्या आरोग्यास निर्माण झालेल्या धोक्याबाबत मागील काही अधिवेशनांत प्रश्न उपस्थित केले आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.  - राहुल कुल आमदार, दौंड 

जलपर्णी सडल्यानंतर डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. नदीकाठच्या गावांत डासांचा फैलाव झाल्यास विविध आजारांचा धोका वाढतो. परिस्थिती हाताळण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे.  -डॉ. पूजा कोकरे वैद्यकीय अधिकारी, राहू आरोग्य केंद्र 

Web Title : मुला-मुठा नदी जलकुंभी से अवरुद्ध, स्वास्थ्य जोखिम पैदा।

Web Summary : जलकुंभी से मुला-मुठा नदी अवरुद्ध, दौंड और हवेली में स्वास्थ्य को खतरा। सड़ती जलकुंभी से मच्छर पैदा होते हैं, जिससे पशुधन और ग्रामीण प्रभावित होते हैं। निवासियों ने तत्काल, प्रभावी समाधान की मांग की।

Web Title : Mula-Mutha River choked by water hyacinth, posing health risks.

Web Summary : Water hyacinth infests Mula-Mutha river, threatening health in Daund and Haveli. Decaying hyacinth breeds mosquitoes, impacting livestock and villagers. Residents demand immediate, effective solutions.