Video: ‘यूपी पोलिस’ बनून व्यापाऱ्याचे अपहरण; ५० लाखांच्या खंडणीचा डाव पोलिसांनी उधळला

By नारायण बडगुजर | Updated: March 10, 2026 17:49 IST2026-03-10T17:49:25+5:302026-03-10T17:49:56+5:30

- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने शंभर किलोमीटर पाठलाग करून चार संशयितांना केली अटक 

Pimpri Chinchwad Crime News Businessman kidnapped by posing as 'UP Police'; Police foils Rs 50 lakh extortion plot | Video: ‘यूपी पोलिस’ बनून व्यापाऱ्याचे अपहरण; ५० लाखांच्या खंडणीचा डाव पोलिसांनी उधळला

Video: ‘यूपी पोलिस’ बनून व्यापाऱ्याचे अपहरण; ५० लाखांच्या खंडणीचा डाव पोलिसांनी उधळला

पिंपरी : ‘उत्तर प्रदेश पोलिस’ असल्याचे भासवत चार जणांनी एका व्यापाऱ्याचे अपहरण करून ५० लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना रहाटणी येथील शिवराजनगर परिसरात घडली. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने तांत्रिक तपास करत १०० किलोमीटर पाठलाग करून संगमनेर येथे चारही संशयिताना पकडले आणि अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली.  

 

सुरेशकुमार बाबूमल जैसवानी (रा. रहाटणी) असे सुटका झालेल्या अपहृत व्यापाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी परिसरात सुरेशकुमार जैसवानी हे त्यांच्या कामानिमित्त बाहेर असताना चार संशयित त्यांच्या जवळ आले. त्यांनी स्वतःला ‘उत्तर प्रदेश पोलिस’ असल्याचे सांगत चौकशी करायची असल्याचे सांगितले. पोलिस असल्याचा धाक दाखवत त्यांनी जैसवानी यांना गाडीत बसण्यास सांगितले. 

अचानक घडलेल्या प्रकारामुळे जैसवानी गोंधळून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, एका संशयिताने त्यांच्या दुचाकीला धक्का देत त्यांना खाली पाडले. त्यानंतर संशयितांनी जबरदस्तीने त्यांना कारमध्ये बसवले आणि तेथून पसार झाले. घटनास्थळी काही नागरिक उपस्थित होते. मात्र, संशयित स्वतःला पोलिस असल्याचे सांगत असल्याने कोणीही हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे व्यापाऱ्याला घेऊन पसार होणे सोपे गेले.

दरम्यान, काही वेळातच संशयितांनी जैसवानी यांच्या मोबाईलवरून त्यांच्या भावाला फोन केला. त्यांनी जैसवानी यांचे अपहरण केल्याचे सांगत ५० लाखांची खंडणी मागितली. पैसे दिले नाहीत तर त्यांना ठार मारण्याची धमकीही दिली. या फोननंतर कुटुंबीय घाबरले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. 

सापळा रचून घेतले ताब्यात

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. जैसवानी यांच्या भावाला विश्वासात घेऊन संशयितांशी फोनवर संपर्क कायम ठेवण्यास सांगण्यात आले. त्याचवेळी मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. कॉल लोकेशनच्या आधारे संशयित शहराबाहेर पळाल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढत सुमारे १०० किलोमीटरचा पाठलाग केला. तपासादरम्यान संशयित संगमनेर परिसरातून पुढे जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचत चारही संशयितांना ताब्यात घेत जैसवानी यांची सुखरूप सुटका केली.

खंडणीसाठी रचला कट

चारही संशयित उत्तर प्रदेश येथील असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. खंडणीसाठी त्यांनी अपहरणाचा कट रचल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

अपहरणाचा थरार सीसीटीव्हीत कैद

रहाटणी परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपहरणाची घटना कैद झाली आहे. फुटेजमध्ये संशयित हे व्यापाऱ्याजवळ येऊन स्वतःला पोलिस असल्याचे सांगताना दिसतात. काही क्षणांतच ते जैसवानी यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून तेथून निघून जात असल्याचे दिसते. 

तांत्रिक तपासातून संशयितांचा माग

-अपहरणानंतर संशयितांनी पीडिताच्या मोबाईलवरून कुटुंबीयांना फोन केला.
-पोलिसांनी कॉल डिटेल्स आणि लोकेशनचा माग काढला.
-मोबाईल लोकेशनवरून संशयित शहराबाहेर पळाल्याचे स्पष्ट.
-सुमारे १०० किलोमीटर पाठलाग करून संगमनेर येथे कारवाई.

Web Title : फर्जी यूपी पुलिस ने व्यवसायी का अपहरण किया, पुलिस ने फिरौती की साजिश विफल की

Web Summary : यूपी पुलिस बनकर चार लोगों ने रहाटनी में एक व्यवसायी का अपहरण कर फिरौती मांगी। पिंपरी-चिंचवड पुलिस ने 100 किलोमीटर पीछा कर संगमनेर से पीड़ित को छुड़ाया और आरोपियों को गिरफ्तार किया। अपहरण सीसीटीवी में कैद हो गया।

Web Title : Fake UP Cops Abduct Businessman, Extortion Plot Foiled by Police

Web Summary : Posing as UP police, four men abducted a businessman in Rahatani, demanding ransom. Pimpri-Chinchwad police traced them 100km to Sangamner, rescuing the victim and arresting the suspects. The abduction was caught on CCTV.