प्रेमाच्या त्रिकोणातून झालेल्या खुनातील आरोपी गुजरातमध्ये जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 11:14 IST2025-06-14T11:13:38+5:302025-06-14T11:14:22+5:30
या प्रेम प्रकरणातून तीन महिन्यांपूर्वी त्या दोघांचे भांडण झाले होते. रात्री दिलीप याने अरुण याला फोन करून थॉमस कॉलनीजवळ जंगल परिसरात बोलावून घेतले.

प्रेमाच्या त्रिकोणातून झालेल्या खुनातील आरोपी गुजरातमध्ये जेरबंद
पिंपरी : देहूरोड येथे थॉमस कॉलनी जंगल परिसरालगत प्रेमाच्या त्रिकोणातून झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने गुजरातमधून जेरबंद केले. सनीसिंग राजीवसिंग राजपूत (वय १९, रा. शिवान, बिहार) असे अटक आरोपीचे नाव आहे. दिलीप मौर्या (वय १६, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अरुण सुखराम मौर्या (वय १४) हा जखमी झाला आहे.
सोमाटणे फाटा येथील एका तरुणीसोबत आरोपी सनी आणि मयत दिलीप या दोघांचेही प्रेम प्रकरण सुरू होते. या प्रेम प्रकरणातून तीन महिन्यांपूर्वी त्या दोघांचे भांडण झाले होते. बुधवारी रात्री दिलीप याने अरुण याला फोन करून थॉमस कॉलनीजवळ जंगल परिसरात बोलावून घेतले. तिथे सनीसिंग आणि दिलीप यांचे भांडण झाले. सनीने दिलीप याच्या गळ्यावर चाकूने वार केले.
भांडण सोडविण्यासाठी अरुण मध्ये पडला असता सनी याने अरुणच्या छातीवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर तो पळून गेला. अरुण जखमी अवस्थेत थॉमस कॉलनीत आला. त्याने मित्रांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. अरुण याला देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे तपास करीत आहेत.