“कुठल्या तरी जन्मात पुन्हा भेटू…” पत्नीला केला शेवटचा मेसेज; पुण्यातील IT अभियंत्याने लोणावळ्यात उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 20:36 IST2026-02-14T20:34:23+5:302026-02-14T20:36:08+5:30
दोन दिवसांपूर्वी लायन्स पॉइंट परिसरात त्यांची चारचाकी संशयास्पद स्थितीत उभी आढळली होती.

“कुठल्या तरी जन्मात पुन्हा भेटू…” पत्नीला केला शेवटचा मेसेज; पुण्यातील IT अभियंत्याने लोणावळ्यात उचलले टोकाचे पाऊल
लोणावळा: पुण्यातील आयटी अभियंत्याने लोणावळ्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ लायन्स पॉइंट येथे दरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वीरेंद्र सिन्हा (वय ३२, रा. बाणेर, पुणे) असे मृत अभियंत्याचे नाव असून, ते पुण्यातील आयटी कंपनीत कार्यरत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी लायन्स पॉइंट परिसरात त्यांची चारचाकी संशयास्पद स्थितीत उभी आढळली होती. पहाटे त्यांनी पत्नी व मित्रांना “कुठल्या तरी जन्मात पुन्हा भेटू…” असा भावनिक संदेश पाठविल्याची माहिती समोर आली आहे.
२५० फूट खोल दरीत मृतदेह आढळला
- सुमारे २५० फूट खोल दरीत अभियंत्याचा मृतदेह आढळून आला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे पुढील तपास करत आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली शिवदुर्ग रेस्क्यू टीम यांनी शोधमोहीम राबवली. यात योगेश उंबरे, महेश मसने, आयुष वर्तक, आयुष पवार, देवश्री चिले, सचिन गायकवाड, कुणाल कडू, कपिल दळवी, योगेश दळवी, सागर दळवी, सागर कुंभार, अनिल आंद्रे, गणेश भांगरे, पिंटू मानकर, महादेव भवार, गणेश म्हसकर, ज्ञानेश्वर आखाडे, संतोष मरगळे, चंद्रकांत गाडे, आनंद गावडे आदींचे मोलाचे सहकार्य केले.
लायन्स पॉइंट बनला सुसाईड पॉइंट
सध्या लायन्स पॉइंट हा सुसाईड पॉइंट बनू लागला आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये याठिकाणी दोन जणांनी आत्महत्या करत जीवनयात्रा संपविली आहे. यापूर्वीदेखील याठिकाणी आत्महत्येच्या अनेक घटना घडल्या आहेत. लोणावळा शहरापासून काही अंतरावर असलेल्या या पर्यटनस्थळी भविष्यामध्ये जागतिक कीर्तीचा ग्लास स्कायवॉक हा प्रकल्प उभा राहणार आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून याठिकाणी आत्महत्येच्या वेगवेगळ्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.