पाळीव श्वान अंगावर सोडले; पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 17:30 IST2025-09-15T17:29:21+5:302025-09-15T17:30:15+5:30

नवी मुंबईत शनिवारी सायंकाळी एक ट्रक कारला घासून गेल्याने वाद झाला होता. कारचालकाने ट्रक चालकाला धमकावून त्याला कारमध्ये घालून अपहरण केले होते

Pet dog left on body; Case registered against Pooja Khedkar's mother Manorama at Chatushrungi police station | पाळीव श्वान अंगावर सोडले; पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पाळीव श्वान अंगावर सोडले; पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : वादग्रस्त अधिकारी, तसेच भारतीय प्रशासकीय सेवेतून निलंबित करण्यात आलेल्या पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर हिच्याविरोधात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक दीपक खरात यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मनोरमा दिलीप खेडकर (४८, रा. नॅशनल हाऊसिंग सोसायटी, बाणेर) हिच्यासह साथीदारांविरोधात भारतीय न्यायसंहिता २२१, २३८, २५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत शनिवारी सायंकाळी एक ट्रक कारला घासून गेल्याने वाद झाला होता. कारचालकाने ट्रक चालकाला धमकावून त्याला कारमध्ये घालून अपहरण केले, अशी फिर्याद नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांचे पथक रविवारी (दि. १४) खेडकर यांच्या बंगल्यात दुपारी दीडच्या सुमारास चौकशीसाठी पाेहोचले. मनोरमा खेडकर यांनी बंगल्याचा दरवाजा उघडला. सहायक पोलिस निरीक्षक दीपक खरात यांनी त्यांना गुन्ह्याची माहिती दिली. खेडकर यांना तपासात मदत करण्यास सांगितले. तेव्हा खेडकर यांनी बंगल्याचा दरवाजा बंद करून घेतला, असे सहायक पोलिस निरीक्षक खरात यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेची माहिती चतु:शृंगी पोलिसांना दिली. चतु:शृंगी पोलिस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत खेडकर यांनी ट्रकचालकाचे अपहरण करणाऱ्या कारचालक आरोपीला पसार होण्यास मदत केली. आरोपी कार घेऊन पसार झाला. पोलिसांना चौकशीत सहकार्य केले नाही, तसेच बंगल्यात पाळीव श्वान सोडून पोलिसांना चौकशीसाठी अटकाव केला, असे खरात यांनी म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अपहरण केलेल्या ट्रक चालकाची नवी मुंबई पोलिसांनी सुटका केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तापस सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील करत आहेत.

पूजा खेडकर हिने भारतीय प्रशासकीय सेवेत बनावट कागदपत्रे सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात त्यांची चौकशी झाली हाेती. त्यानंतर बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मनोरमा खेडकर हिने मुळशी तालुक्यातील एका शेतकऱ्याला जमिनीच्या वादातून पिस्तुलाचा धाक दाखविल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पौड पोलिस ठाण्यात मनोरमा खेडकर हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Pet dog left on body; Case registered against Pooja Khedkar's mother Manorama at Chatushrungi police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.