पुण्यात ६ तर पिंपरीमध्ये ३ नवीन पोलीस ठाण्याला मान्यता : मंत्रालयातील बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 20:23 IST2021-01-04T20:22:15+5:302021-01-04T20:23:17+5:30

पिंपरीला २ कोटी, पुणे पोलीस आयुक्तालयाला १ कोटींचा निधी

Permission to new 6 police station in pune and 3 pimpri | पुण्यात ६ तर पिंपरीमध्ये ३ नवीन पोलीस ठाण्याला मान्यता : मंत्रालयातील बैठकीत निर्णय

पुण्यात ६ तर पिंपरीमध्ये ३ नवीन पोलीस ठाण्याला मान्यता : मंत्रालयातील बैठकीत निर्णय

पुणे : पुणे शहरात नव्याने समाविष्ट गावांसह वाढते शहरीकरण लक्षात घेऊन पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता देण्यात आली. पुणे जिल्ह्यातील वाघोली, ऊरळी कांचन, बाणेर, काळेपडळ, खराडी, फुरसुंगी, म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव या नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत सोमवारी (दि. ४) घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार अशोक पवार, सुनील टिंगरे, चेतन तुपे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

पुणे पोलीस आयुक्तालयातील तीन झोनचे रुपांतर पाच झोनमध्ये करण्याचा आणि लोणीकाळभोर, वाघोली व लोणीकंद पोलीस ठाण्यांचा पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात समावेश करण्याचा निर्णय यावेळी झाला. लोणीकंद पोलीस ठाण्यातून नवीन वाघोली पोलीस ठाणे, लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातून उरळीकांचन पोलीस ठाणे, हवेली पोलीस ठाण्यातून नवीन नांदेड सिटी पोलीस ठाणे, चतु:श्रृंगी व हिंजवडी पोलीस ठाण्यातून नवीन बाणेर पोलीस ठाणे, हडपसर-कोंढवा व वानवडी पोलीस ठाण्यातून नवीन काळेपडळ पोलीस ठाणे, नवीन फुरसुंगी पोलीस ठाणे, चंदननगर पोलीस ठाण्यातून नवीन खराडी तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव अशा नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी देण्यात आली आहे. पुणे जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून पुणे शहर पोलीस आयुक्तालयाला आणि जिल्हा ग्रामीण पोलीसांना वाहन खरेदीसाठी प्रत्येकी १ कोटी तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला २ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

................

हडपसरमध्ये २ नवीन पोलीस ठाणी

हडपसर परिसरात आता २ नवीन पोलीस ठाण्यांना मान्यता देण्यात आली. बैठकीला उपस्थित आमदार चेतन तुपे यांनी सांगितले की, आता हडपसर, काळेपडळ आणि फुरसुंगी अशी तीन पोलीस ठाणी असणार आहेत. वानवडी पोलीस ठाणे, कोंढवा पोलीस ठाणे, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काही भाग मिळून काळेपडळ पोलीस ठाण्याची निर्मिती होणार आहे. तसेच देवाची ऊरळी, वडकी,शेवाळवाडी, मंतरवाडी व लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील काही हद्दीचा समावेश करुन फुरसुंगी पोलीस ठाणे अस्तित्वात येणार आहे.
.......

बावधन पुण्यातच
पिंपरी चिंचवड पोलिसांनी बावधन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु, तो सर्व भाग आता पुणे महापालिकेत समाविष्ट झाला असल्याने हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावधन तसेच चतु:श्रृंगी परिसरातील काही भाग मिळून बाणेर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे.

Web Title: Permission to new 6 police station in pune and 3 pimpri