-------------
वाल्हे : पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरील वाल्हे येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाकडे जाण्यासाठी गावातील मुख्य मार्गावर सुकलवाडी रेल्वेगेट येथील भुयारीमार्गावर पावसाचे पाणी साठते व त्यामुळे हा मुख्य मार्ग बंद होतो. याबाबत रेल्वेप्रशासनाला अनेकदा गावकऱ्यांनी निवेदन देऊनही त्यावर उपाययोजना केली गेली नाही, त्यामुळे आज प्रवीण शिंदे, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, माणिकराव झेंडे यांनी प्रत्येक्ष पुलाखाली येऊन यावरील उपाययोजनांच्या शक्यतांची पाहणी केली व उद्या रेल्वे अधिकाऱ्यांशी बैठक आयोजिली आहे.
पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावरील वाल्हे (ता. पुरंदर) येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाकडे जाण्यासाठीचा हा मुख्य मार्ग आहे. तसेच, सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी, राख, नावळी, कापडदरा, झिरप वस्ती, कर्नलवाडी, रणवरेवाडी, गुळुंचे तसेच लहान - मोठ्या वाड्या- वस्तींना जोडणाराही हा मुख्या मार्ग आहे. रस्त्यावरील सुकलवाडी रेल्वे गेट येथील भुयारी मार्गावर पावसाचे वारंवार साठते. पाण्याचा निचरा होण्यासाठी येथे कोणतीच व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे पाऊस थांबला, तरी भुयारात साचलेले चार फुटांपर्यंतच्या पाण्याचा निचरा चार-चार दिवस होत नाही अनेकदा मोटार लावून येथील पाणी काढावे लागले आहे तो पर्यंत हा मार्ग बंद होतो.
हे काम लवकरात- लवकर मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बुधवार (दि.९) पुणे येथील मुख्य रेल्वे कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीस रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच, स्थानिक निवडक नागरिक, पदाधिकारी यांच्या बरोबर चर्चा करून, रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात जागेवर येऊन पाहणी करावी अशीही विनंती करणार असल्याची माहिती प्रवीण शिंदे यांनी दिली. त्या अनुषंगाने शिंदे यांनी प्रत्यक्षात जागेवर येऊन, पाहणी करून, रेल्वेच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधला.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे,पुरंदर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार, प्रा. संतोष नवले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदेश पवार, डॉ.रोहिदास पवार, तंटामुक्ती अध्यक्ष नारायण पवार, तानाजी भुजबळ आदी उपस्थित होते.
--
चौकट
पहिल्याच पावसात मार्ग ब्लॉक
यंदा पहिल्याच पावसामध्ये येथील भुयारी मार्ग पुन्हा जलमय झाला होता. पाऊस सायंकाळच्या दरम्यान आला असल्याने, भुयारी मार्गात साठून राहिलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने, यावेळी अनेक दुचाकी, चारचाकी वाहने भुयारी मार्गात साठलेल्या पाण्यातून वाट काढताना, वाहनांमध्ये पाणी गेल्याने अनेक वाहने बंद पडून, नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या संकटाला मागील दोन वर्षांपासून येथील रहिवाशी, प्रवासी, विद्यार्थी तोंड देत आहेत.
--
फोटो क्रमांक १ : ०८ वाल्हे सुकलवाडी भुयार पाहणी
फोटो ओळी : वाल्हे (ता.पुरंदर) येथील, सुकलवाडी रेल्वे गेट येथील भुयारी मार्गची पहाणी करताना प्रवीण शिंदे, प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, माणिकराव झेंडे आदी.
--
फोटो क्रमांक २ : ०८ वाल्हे सुकलवाडी रेल्वे भुयार पाणी