पुण्यात वाहन चालवताना मोबाईलवर व्हिडीओ पाहणारे वाढले; अपघातात बळी जाऊनही गांभीर्य नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:44 IST2025-07-25T13:44:23+5:302025-07-25T13:44:46+5:30
एका हातात गाडीचे हॅण्डल अथवा स्टेअरिंग आणि दुसऱ्या हातात मोबाइल पकडून गाडी चालवत बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे

पुण्यात वाहन चालवताना मोबाईलवर व्हिडीओ पाहणारे वाढले; अपघातात बळी जाऊनही गांभीर्य नाही
पुणे : दुचाकी अथवा चारचाकी वाहन चालवत असताना मोबाइलचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण शहरात मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे अपघात होऊन अनेकांचा बळीदेखील गेला आहे. असे असले तरी पुणेकर मात्र बिनधास्त वाहन चालवताना मोबाइलचा सर्रास वापर करीत आहेत. यातील काही महाभाग चारचाकी चालवताना मोबाइलवर व्हिडीओ, वेबसिरीज बघत वाहन चालवत असल्याचे अनेकदा दिसून येते. या गंभीर समस्येवर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे; मात्र, ती कारवाई अपुरी पडत असल्याचे यावरून दिसून येते.
दुसऱ्यांच्या जिवाचा विचार करा..
अनेकदा मोबाइलचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना दुसरे वाहन चालक सावध करतात, त्यावर मुजोर वाहनचालक त्यांनाच दमदाटी आणि शिवीगाळ करतात. या वाहनचालकांनी स्वत:च्या जिवासह दुसऱ्यांच्या जिवाचा विचार करणे गरजेचे आहे. मोटार वाहन कायद्यामध्ये वाहन चालवताना मोबाइलवर बोलू नये, असे म्हटले आहे. असे असताना जर अतिआवश्यक फोन असेल, तर वाहन थांबवून बोलणे गरजेचे आहे. पण, सगळे नियम धाब्यावर बसवत मोबाइलवर बोलणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही. विशेष म्हणजे शासकीय बस, शासकीय वाहने यांच्यावरील चालकही गाडी चालवताना मोबाइलवर बोलत असताना दिसतात. एका हातात गाडीचे हॅण्डल अथवा स्टेअरिंग आणि दुसऱ्या हातात मोबाइल पकडून गाडी चालवत बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे.
पोलीस दिसले की फोन बाजूला..
अनेकदा वाहनचालक मोबाइलवर बोलत अथवा व्हिडीओ बघत वाहन चालवत असताना समोर पोलिस दिसले की फोन बाजूला अथवा खिशात ठेवतात. यामुळे पोलिसांच्या दंडात्मक कारवाईपासून ते वाचतात. असे असले तरी अपघातापासून वाचण्याची शक्यता काही दूर होणार नाही याचा विचार वाहनचालकांनी करणे गरजेचे आहे.
सामाजिक भान गरजेचे..
मोबाइलचा अति वापर आज सगळ्या ठिकाणी होत आहे. सतत लोकांच्या संपर्कात राहण्यापेक्षा सोशल मीडियावरील रील्स बघण्याकडे मोबाइल वापरणाऱ्यांचा कल अधिक आहे. याशिवाय कामाच्या दबावामुळेदेखील लोक मोबाइलवर बोलत वाहन चालवतात. अनेकांना हे चुकीचे आहे, हे माहीत असूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकदा पोलिसांकडूनदेखील म्हणावी तशी कारवाई अशा वाहनधारकांवर होत नाही. मात्र, अशा वागणुकीमुळे समाजात असुरक्षिततेची भावना नक्की निर्माण होते. त्यामुळे सामाजिक भान असणेदेखील अत्यंत गरजेचे आहे.
पोलिसांकडून १२ लाखांचा दंड ठोठावला..
१ जानेवारी ते २३ जुलै या कालावधीत मोबाइलवर बोलत वाहन चालवणाऱ्या १ हजार २१६ वाहन चालकांवर पोलिसांनी केसेस केल्या आहेत. या वाहनचालकांवर १२ लाख १६ हजार रुपयांची दंडात्मक कारवाईदेखील पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून करण्यात आली आहे.
वाहन चालवताना कोणीही मोबाइलवर बोलू नये. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याचा धोका असतो. वाहनचालकांनी स्वतःसह इतरांची काळजी घ्यावी. शहरात वाहन चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे. यामध्ये बेशिस्त वाहनचालकांचा परवानादेखील रद्द केला जाऊ शकतो. - हिंमत जाधव, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा