भोरचे लोकहो तुम्ही ठरवा! अजितदादांबरोबर राहायचं की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जायचं - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 17:36 IST2025-11-21T17:35:50+5:302025-11-21T17:36:08+5:30
देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोदीजींच्या नेतृत्वावर आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रचंड विश्वास आहे

भोरचे लोकहो तुम्ही ठरवा! अजितदादांबरोबर राहायचं की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जायचं - चंद्रकांत पाटील
भोर : जरी इथे अजित पवारांची सत्ता असली तरी राज्याच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत भोरच्या जनतेने ठरवायचंय अजित पवार यांच्या बरोबर राहायचं? का राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जायचे असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
भोर नगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ वाघजाई मंदिरात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संग्राम थोपटें,शेखर वढणे,राजेंद्र शिळीमकर,स्वरूपा थोपटे,संजय जगताप, पृथ्वीराज थोपटे,सचिन हर्णसकर,पल्लवी फडणीस,शैलेश सोनवणे,रवींद्र कंक,संतोष धावले,प्रमोद कुलकर्णी,गणेश पवार,अभिषेक,येलगुडे,जीवन कोंडे,दीपाली शेटे,स्वाती गांधी,राजेंद्र गुरव,सुभाष कोंढाळकर,सुधीर खोपडे,सादिक फरास,सचिन मांडके उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, भोर तालुक्यातील रोजगाराच्या दृष्टीने औद्योगिक वसाहतीचा प्रश्न महत्वाचा असून भोरच्या औद्योगिक वसाहतसाठी करण्यासाठी प्रयत्न करू आणि येथील महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. बिहार विधानसभा निवडणुकीत NDA ला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे नितीश कुमार हे पुन्हा मुख्यमंत्री झाले. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला मिळालेल्या जनादेशामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन झाले. देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोदीजींच्या नेतृत्वावर आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रचंड विश्वास आहे. देश क्रमांक एक बनावा, भारताचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मोदीजी सतत प्रयत्नशील आहेत. नागरिकांसाठी अनेक लोकोपयोगी योजना राबवून त्यांनी सर्वसामान्यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडवला आहे. या सर्व योजनांचा लाभ स्थानिक पातळीवर प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी भोर नगर परिषदेतही भाजपाचे सरकार असणे अत्यावश्यक आहे, हे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माजी आमदार संग्राम थोपटें म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन भाजपात प्रवेश केला. मागील वेळी नगराध्यक्ष व नगरसेवक १८ अशा जिंकल्या होत्या. वाघजाई देवी भोरचे ग्रामदैवत असून प्रचाराचा शुभारंभ वाघजाई मंदिरात केला की कौल मिळतो आणि मोठ्या प्रमाणात यश येते अशी येथील परंपरा असून यावेळी ती परंपरा कायम राहील आणि २१ शून्य अशी कामगिरी होईल.