संथ कामाबद्दल ठेकेदाराला दंड

By Admin | Updated: July 3, 2014 05:39 IST2014-07-03T05:39:30+5:302014-07-03T05:39:30+5:30

सातारा रस्त्यावरील बालाजीनगर येथील उड्डाणपुलाचे काम धीम्या गतीने सुरू आहे

Penalty penalty for slow work | संथ कामाबद्दल ठेकेदाराला दंड

संथ कामाबद्दल ठेकेदाराला दंड

पुणे : सातारा रस्त्यावरील बालाजीनगर येथील उड्डाणपुलाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. महापालिकेच्या मुदतीत हे काम पूर्ण होणार नसल्याने ठेकेदाराला प्रतिदिन २००० रुपयांप्रमाणे एकूण १५ लाख रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाने उड्डाणपुलाच्या धीम्या गतीसाठी केलेली ही पहिलीच कारवाई असून, येत्या डिसेंबर २०१४ पूर्वी काम पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले आहेत.
भारती हॉस्पिटल ते चव्हाणनगर कमान असा १२१५ मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. त्यासाठी ४७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चरला २८ डिसेंबर २०११ ला ३० महिन्यांत उड्डाणपूल उभारण्याची मुदत दिली होती. त्यानंतर शंकर महाराज मठाजवळ जागेची अडचण असल्याने ५७ कोटी ७८ लाख रुपयांचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला. ठेकेदाराने उड्डाणपुलाचे काम जुलै २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, काही दिवसांपासून उड्डाणपुलाचे काम संथ सुरू असल्याची तक्रार नगरसेवक दत्तात्रय धनकवडे यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी या कामांची पाहणी करून तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले होते.
दरम्यान, आयुक्त विकास देशमुख, अतिरिक्त नगर अभियंता श्रीनिवास बोनाला, नगरसेवक विशाल तांबे, दत्तात्रय धनकवडे, राजेंद्र शिळीमकर, श्रीनाथ भिमाले, सुवर्णा पायगुडे, मोहिनी देवकर, अस्मिता
शिंदे यांनी उड्डाणपुलाची पाहणी
आज केली. (प्रतिनिधी)

Web Title: Penalty penalty for slow work