ॲनिमल ॲम्ब्युलन्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघड
By नम्रता फडणीस | Updated: July 15, 2024 16:24 IST2024-07-15T16:23:26+5:302024-07-15T16:24:12+5:30
वाहनचालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात समोर आले असून, विमानतळ पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली

ॲनिमल ॲम्ब्युलन्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात उघड
पुणे : ॲनिमल ॲम्ब्युलन्सच्या धडकेत रस्ता क्रॉस करत असलेल्या पादचा-याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी ( दि. १३) रोजी रात्री पावणे आठ वाजता लोहगावमधील फाॅरेस्ट पार्क रस्ता परिसरात घडली. वाहनचालकाने मद्यप्राशन केल्याचे तपासात समोर आले असून, विमानतळ पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली.
सुरेंद्रसिंग शैलेंद्रसिंग कुम्पावत (वय ४८, रा. श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, चंदननगर, खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी ॲनिमल ॲम्ब्युलन्स चालक संजय चण्णाप्पा मुल्लोळी (वय २६, रा. वाडेबोल्हाई, नगर रस्ता, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सुरेंद्रसिंह यांचा लहान भाऊ महेंद्रसिंग (वय ४३) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुरेंद्रसिंग शनिवारी ( दि. १३) लोहगाव भागातील फाॅरेस्ट पार्क परिसरातून निघाले होते. त्यावेळी भरघाव वेगातील रुग्णवाहिकेने रस्ता ओलांडणाऱ्या सुरेंद्रसिंग यांना जोरदार धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्रसिंग यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी मुल्लोळी याला ताब्यात घेण्यात आले. त्याने मद्यप्राशन केल्याचे उघड झाले. मध्यरात्री त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.