बीएच मालिकेच्या वाहनांची वेळेत कर भरा, अन्यथा वर्षाला ३६ हजार दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:18 IST2025-09-03T13:18:39+5:302025-09-03T13:18:54+5:30
एखादे वाहन दुसऱ्या राज्यात फक्त १२ महिने चालवू शकतात. त्यानंतर त्या राज्यात चालवायचे झाल्यास त्या राज्यातील मोटर वाहन अधिनियम, १९८८, कलम ४७ अंतर्गत वाहनांची नोंदणी करणे बंधनकारक असते.

बीएच मालिकेच्या वाहनांची वेळेत कर भरा, अन्यथा वर्षाला ३६ हजार दंड
पुणे: भारत (बीएच) मालिकेमध्ये वाहने सुरुवातीला दाेन वर्षांसाठी नोंदणीकृत केली जाते. त्यानंतर वाहनांचा दरवर्षी कर भरावा लागतो. तो कर न भरल्यास वैध कालावधीपासून ७ दिवसांनंतर प्रतिदिन १०० रुपये इतका दंड आकारला जातो. एका वाहनाचे एक वर्षे कर न भरल्यास वर्षाला ३६ हजार दंड लागू होते. त्यामुळे बीएच मालिकेच्या वाहन मालकांनी वेळेत कर भरावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहनांची नोंदणी हस्तांतरित (व्हेकल रजिस्ट्रेशन ट्रान्सफर) करणे टाळण्यासाठी २०२१ मध्ये रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने बीएच सिरीज सुरू केली. केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने बीएच सिरीजची सुविधा संरक्षण विभागाचे कर्मचारी, केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचारी यांना दिली आहे. एखादे वाहन दुसऱ्या राज्यात फक्त १२ महिने चालवू शकतात. त्यानंतर त्या राज्यात चालवायचे झाल्यास त्या राज्यातील मोटर वाहन अधिनियम, १९८८, कलम ४७ अंतर्गत वाहनांची नोंदणी करणे बंधनकारक असते. परंतु, वाहन मालकाकडे बीएच नंबर सिरीज असेल तर त्याला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी कोणतीही परवानगी घ्यायची गरज लागत नाही. पुण्यात केंद्र सरकारची कार्यालय, लष्करी आस्थापना, बहुराष्ट्रीय कंपन्या यांची कार्यालय मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे बीएच मालिकेतील वाहने घेण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पुण्यात बीएच सिरीज वाहनांची संख्या जास्त आहे.
बीएच मालिकेतील वाहनांसाठी दोन वर्षांसाठी कर घेतला जातो. त्यानंतरच्या सात दिवसांनंतर प्रतिदिन १०० रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे बीएच मालिकेमध्ये नोंदणीकृत असलेल्या वाहनांचा कर वेळेत भरून वाहन मालकांनी दंड टाळावा. -स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे