"पुण्यात पठाण प्रदर्शित होऊ देणार नाही", बजरंग दलाचा इशारा, शहरातील पोस्टरही काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 14:27 IST2023-01-23T14:27:06+5:302023-01-23T14:27:19+5:30
शहरात कुठंही पोस्टर दिसल्यास बजरंग दलाकडून काढण्यात येईल

"पुण्यात पठाण प्रदर्शित होऊ देणार नाही", बजरंग दलाचा इशारा, शहरातील पोस्टरही काढले
पुणे: शाहरुख खानचा वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पठाण चित्रपट येत्या २५ जानेवारीला देशभरात प्रदर्शित होणार आहे. परंतु हिंदुत्ववादी संघटनेने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्याचे आता पुण्यातही पडसाद उमटले आहेत. शहरातील राहुल टॉकीजच्या इथे लावण्यात आलेले पठाण चित्रपटाचे पोस्टर बजरंग दलाकडून काढण्यात आले आहे. पुण्यातही पठाण चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा बाजारणंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
पठाण या चित्रपटातील बेशरम रंग आणि झुमे जो पठाण ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. यामधील बेशरम गाण्यामधील दीपिका पादुकोणच्या बिकिनीच्या रंगामुळे वाद निर्माण झाला होता. अनेकांनी दीपिकाच्या बिकिनीच्या रंगावर टीका केली होती. त्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पठाण चित्रपटाची ऍडव्हान्स बुकींगलाही जोरदार प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषेंमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. शाहरुखसोबतच पठाण चित्रपटात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.शाहरुखचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. पठाण' २५ जानेवारीला प्रदर्शित होणार असून सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. सिनेमाच्या पहिल्या दिवशी 'पठाण' मजबूत कमाई करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
शहरात कुठेही पठाण चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही.
राहुल टॉकीज समोर काही शाहरुख खानच्या फॅन्सनी पठाण चित्रपटाचे पोस्टर लावले होते. आम्ही त्यांना विनंती केली आणि ते पोस्टर काढायला लावले. पुणे शहरात कुठेही पठाण चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. तसेच कुठेही अशा प्रकारचे पोस्टर लावल्यास ते बजरंग दलाकडून काढण्यात येणार आहे. असे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.