पुणे : रेल्वेमार्गावर झोपलेल्या १६ मजुरांना मालगाडीने चिरडल्याची घटना शुक्रवारी पहाटे औरंगाबादमध्ये घडल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी पुण्यात उरळीजवळ त्याची पुनरावृत्ती टळली. चालकाच्या सतर्कतेमुळे रेल्वेमार्गावर बसलेल्या २० लोकांपासून १०० मीटर अंतरावर मालगाडी थांबल्याने मोठा अनर्थ टळला.मध्य प्रदेशच्या दिशेने रेल्वेमार्गावरून निघालेले मजुर शुक्रवारी पहाटे औरंगाबादजवळ मार्गावरच झोपले होते. पहाटेच्या सुमारास आलेल्या मालगाडीने त्यातील १६ जणांना चिरडले. चालकाने हॉर्न वाजवून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. पण वेग जास्त असल्याने थांबेपर्यंत मजुर गाडीखाली आले होते. अशीच घटना शुक्रवारी सायंकाळी उरळी ते लोणी स्टेशनदरम्यान होता होता टळली. ही घटना ताजी असतानाही काही लोक उरळीजवळ मार्गावरच ठाण मांडून बसले होते. उरळीवरून सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे निघालेल्या मालगाडी चालकाला काही अंतरावर हे लोक दिसले. त्याने तातडीने हॉर्न वाजवून आपत्कालीन ब्रेक लावला. वेळीच सतर्कता दाखविल्याने ही लोकांपासून १०० मीटर अंतरावरच थांबविली. त्यामुळे त्यावेळी जवळपास २० लोक गाडीखाली येण्यापासून बचावले व मोठी दुर्घटना टळली.चालकाने तातडीने नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. त्यानंतर काही वेळात ट्रॅकवर बसलेल्या लोकांना तिथून हटविण्यात आले. त्यांना घटनेचे गांभीर्य समजावून सांगत रेल्वेमार्गावरून चालून जीव धोक्यात न घालण्याचे सांगण्यात आले. या लोकांतील काही जणांकडे सामानही होते. त्यामुळे ते बाहेरगावी निघाले असण्याची शक्यता आहे. पण ते नेमके कुठे चालले होते, याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून या घटनेबाबत अधिकृत माहिती देण्यास असमर्थता दर्शविण्यात आली.
--------------
जीव धोक्यात घालू नकाऔरंगाबाद येथे घडलेल्या घटनेनंतरही जीव धोक्यात घालून अजूनही काही लोक रेल्वे ट्रॅकवर येत आहेत. यापार्श्वभुमीवर रेल्वे ट्रॅक किंवा त्याच्या आसपास असणे धोकादायक आहे. येण्या-जाण्यासाठी याचा उपयोग अजिबात करून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.लॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतुक पुर्णपणे बंद असल्याचे लोकांना वाटत आहे. पण पहिल्या दिवसापासून केवळ प्रवासी वाहतुक बंद आहे. मालगाड्या नियमितपणे धावत आहेत. तसेच काही दिवसांपासून श्रमिक स्पेशल गाड्याही सोडण्यात येत आहेत. त्यामुळे कोणत्या ट्रॅकवरून कोणती गाडी कधी येईल, हे सांगता येत नाही. पण परराज्यात जाणारे अनेक मजुर रेल्वे ट्रॅकवरूनच पायी जात आहेत. तसेच विश्रांतीसाठीही ट्रॅकचाच आधार घेत आहेत. याच कारणामुळे शुक्रवारची घटना घडली आहे. त्यामुळे रेल्वेने लोकांना रेल्वे ट्रॅकवरून किंवा जवळून न चालून जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन केले आहे.--------------