Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 23:16 IST2025-11-06T23:15:03+5:302025-11-06T23:16:57+5:30
Parth Pawar Land Deal: पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या भूखंड प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुद्रांक शुल्क बुडवल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यात पार्थ पवारांचे नाव नाही.

Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही
Parth Pawar Land Deal Pune: पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांच्या कंपनीने बाजारभावापेक्षा कितीतरी पट कमी किंमतीत ४० एकर भूखंड खरेदी केल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये पार्थ पवारांचे नाव नाही. पोलिसांनी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी कंपनीने ही जमीन खरेदी केली होती. १८०० कोटी रुपयांचा हा भूखंड अवघ्या ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आला. त्याचबरोबर मुद्रांक शुल्कही माफ करून घेण्यात आले. हा विषय समोर आल्यानंतर राज्याचे राजकारण तापले.
पार्थ पवारांचे तक्रारीतच नाव नाही
या प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळून निघाले. या प्रकरणी सायंकाळी दस्तनोंदणी अधिकाऱ्यांकडून तक्रार देण्यात आली. या तक्रारीत पार्थ पवारांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांनीही गुन्हा दाखल करताना तिघांविरोधातच दाखल केला.
शेतकऱ्यांकडून दिग्विजय पाटील यांनी ही जमीन घेतलेली आहे. त्यात इतर दोघांना आरोपी करण्यात आले आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमेडिया कंपनीचा पत्ता हा पार्थ पवार राहतात, तोच आहे. त्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का? असे पोलीस अधिकाऱ्यांना विचारण्यात आले. त्यावर अधिकारी म्हणाले की, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार अधिकचा तपास करून सांगता येईल. रवींद्र तारू उपनिंबंधक होते. त्यांनी याची नोंदणी केली होती. सखोल तपास केल्यानंतर यात अधिकची माहिती देता येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.