Pune Accident: देवीच्या मिरवणुकीत देखाव्याचा काही भागाचा विद्युत तारेला स्पर्श; कार्यकर्त्याचा मृत्यू, वाघोलीतील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 20:57 IST2025-10-10T19:51:19+5:302025-10-10T20:57:35+5:30
Wagholi Electric Shock Accident: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी वाघोलीतील उबाळेनग भागातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाकडून देवीची मिरवुणक काढण्यात आली होती

Pune Accident: देवीच्या मिरवणुकीत देखाव्याचा काही भागाचा विद्युत तारेला स्पर्श; कार्यकर्त्याचा मृत्यू, वाघोलीतील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
पुणे: कोजागरी पौर्णिमेनिमित्त काढण्यात आलेल्या देवीच्या मिरवणुकीतील देखाव्याचा काही भागाचा विद्युत तारेला स्पर्श झाला. या दुर्घटनेत एका मंडळाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची घटना वाघोली भागातील उबाळेनगमध्ये घडली. या प्रकरणी एका मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
नितीन मोहन पवार (२३, रा. उबाळेनगर, वाघोली ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वसुंधर शिवदासभाऊ उबाळे, संदीप छगनराव वहाडणे (रा. रेणूका पार्क, वाघोली), संजीव श्रीपती जगदाळे (रा. उबाळेनगर), सचिन राजू नलावडे (रा. गोरे वस्ती, वाघोली) संकेत शिवाजी राउत (रा. शिरवली बुद्रुक, जुन्नर), मयूर मच्छिंद्र थोरात (रा. मांजरवाडी, जुन्नर) मेहुल अविनाश नवले (रा. कुरंद, जुन्नर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस कर्मचारी अमोल काळे यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी वाघोलीतील उबाळेनग भागातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाकडून देवीची मिरवुणक काढण्यात आली. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. देखाव्याची उंची कमी ठेवण्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र, पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करुन मंडळाने १७ फुट उंच आणि १४ फुट रूंद देखावा, ट्रॅक्टर ट्राॅलीवर केला होता. ट्रॅक्टर ट्राॅलवर साऊंड सिस्टिम लावली होती. मिरवणूक सुरू असताना रेणुका पार्क रस्त्यावर ट्रॅक्टर ट्राॅलीवर साकारलेल्या देखाव्यातील काही भागाचा विद्युत तारेला स्पर्श झाला. मंडळाचा कार्यकर्ता नितीन पवार याला विजेचा धक्का बसला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे चौकशीत उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करत आहेत.