बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:35 IST2025-12-17T11:33:09+5:302025-12-17T11:35:37+5:30
Beed Crime News: बदामबाई पीडित मुलीच्या घरी गेली होती. तिच्या आईवडिलांना म्हणाली की तुमची मुलगी कलाकेंद्रात डान्स शिकेल आणि तुम्हाला पैसेही मिळतील. पण, मुलीसोबत असे काही घडले की, कुटुंब हादरले.

बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
अल्पवयीन मुलीला डान्सची आवड होती. तिच्यावर बारामतीला येणं जाणं असलेल्या बदामबाईची नजर पडली. ती मुलीच्या आईवडिलांना भेटली. कलाकेंद्रात मुली हव्यात आहेत. तुमची मुलगी डान्स शिकेल आणि तुम्हाला पैसेही मिळतील. आईवडिलांनी विश्वास टाकला, पण बदामबाईने अल्पवयीन मुलीला अंबाजोगाईला आणले आणि त्यानंतर जे घडले, ते संतापजनक आहे. या मुलीला अंबाजोगाईला आणण्यात आले आणि त्यानंतर तीन पुरुषांच्या हवाली करण्यात आले.
पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या बदामबाई गोकूळ आणि तिच्या सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन पुरुषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ही संतापजनक घटना समोर आली. या घटनेने बारामतीसह अंबाजोगाईमध्येही खळबळ उडाली.
पीडित मुलगी बारामती तालुक्यातील एका गावात आईवडिलांसह राहते. मुलीला गायन आणि नृत्य करण्याची आवड आहे. पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २४ एप्रिल २०२५ रोजी अंबाजोगाईतील बदामबाई गोकूळ या महिलेने पीडित मुलीच्या कुटुंबीयांसोबत संपर्क केला होता.
माझ्या कला केंद्रामध्ये नृत्य करण्यासाठी मुलींची गरज आहे. मुलीला पाठवले, तर ती डान्स शिकेल आणि पैसेही मिळतील, असे बदामबाई पीडित मुलीच्या आईवडिलांना म्हणाली. मुलीच्या आईने तिच्यावर विश्वास ठेवला आणि मुलीला पाठवण्यास होकार दिला.
मुलीला पायल कला केंद्रावर नेले आणि...
बदामबाई मुलीला अंबाजोगाई येथील पायल कला केंद्रामध्ये घेऊन गेली. मुलीने तिथे राहण्यास नकार दिला. त्यानंतर बदामबाई आणि इतर दोन जणांनी मुलीला बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर ते मुलीला अंबाजोगाईतील साई लॉजवर घेऊन गेले.
साई लॉजवर नेल्यानंतर पीडित मुलीला तीन पुरुषांच्या हवाली करण्यात आले. त्यानंतर बदामबाई तिथून निघून गेली. लॉजवर असलेल्या मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एक अज्ञात व्यक्ती अशा तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
पुन्हा कला केंद्रात नेले
पीडित मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिघे तिला पुन्हा पायल कला केंद्रावर घेऊन गेले. तिथेही वेश्या व्यवसाय करण्यासाठी तिच्यावर बळजबरी केली गेली. हा सगळा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीने लपून तिच्या आईला कॉल केला आणि घडलेली सगळी आपबीती सांगितली.
त्यानंतर तिची आई तातडीने अंबाजोगाईला आली आणि मुलीची कला केंद्रामधून सुटका केली. आई मुलीला बारामतीला घेऊन आली आणि त्यानंतर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने बदामबाईसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा बारामती पोलिसांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणाचा तपास आता अंबाजोगाई पोलीस करत आहेत.