इंदापूर: रविवारच्या रात्रीपासून सोमवारच्या सकाळपर्यंत पावसाने तालुक्यात मे महिन्यानंतर आणखी एकदा घातलेल्या सर्वदूर थैमानामुळे ओढे- नाले पाण्याने भरुन पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इंदापूर तालुक्यातील १३ गावामध्ये पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होऊन १७३ कुटुंबे बाधित झाली आहेत. चार गावांमधील ७ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. सणसरमधीत बाधित कुटुंबांची संख्या सर्वाधिक (८०) आहे. इंदापूर शहरात देखील व्यापारी संकुले, देवालयांमध्ये पाणी घुसले आहे. शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. पुणे परिसरातील घाटमाथा व उजनी धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळी उच्चतम पातळीवर पोहचली असल्याने पूर नियंत्रणासाठी धरण व्यवस्थापनाने सोमवारी विसर्ग सुरु केला आहे. आवश्यकतेनुसार तो वाढवण्यात येणार असल्याने लोकांनी नदीपात्रात जाऊ नये, सखल भागातील जनावरे व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, गेल्या दोन दिवसांत इंदापूर तालुका व शहर परिसरात कमी जास्त प्रमाणात पाऊस चालूच आहे. मात्र रविवारी रात्री दहा वाजल्यापासून सोमवारी सकाळी साडेसात वाजेपर्यंत सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. भिगवण (४६ मि.मी.),इंदापूर. (६४ मि.मी.),लोणी देवकर (६५ मि.मी.), बावडा (४९ मि.मी.),काटी (५२ मि.मी.),निमगाव केतकी (४९ मि.मी.),अंथुर्णे (४० मि. मी.),सणसर.( ६२ मि.मी.),पळसदेव (५२ मि.मी.) एवढ्या पावसाची नोंद या एका दिवसाच्या पावसामुळे झाली. शेटफळ गढे गावात एकाच रात्रीत १५६ मिलीमीटर पाऊस झाला. गावात झालेल्या पावसाचे व वरुन येणारे पाणी तेथील ओढ्यात पाणी बसले नाही. त्यामुळे नजीकच्या आठ ते नऊ घरात पाणी घुसले. वरच्या भागातील पाणी मदनवाडी तलावातून उजनी धरणाकडे पाणी जाताना डाळज भागातील पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होवून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दौंड पासून येणारे पावसाचे पाणी खडकवासला कालव्यातून खाली आले. पाण्याच्या दबावामुळे ४४ क्रमांकाचा जोडफाटा फुटला. त्यातील पाणी सणसरमधील घरात व शेतात पाणी घुसले. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ८० कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले. पावसाचे पाणी शेतात साठल्याने पेरु, डाळिंब व तरकारीच्या पिकांसह इतर पिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे इंदापूर शहरातील भार्गवराव तलाव परिसर, टाऊन हॉल समोरचा भाग,तळ्याची पाळी ते पाणदरा नाला, पाणदरा नाला ते डॉ.आंबेडकर चौक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. बाब्रस मळा,बावडावेस माळी गल्ली संत सावता माळी मंदिर परिसर,राजेवली नगर,तापी व विमल अपार्टमेंट परिसर, मालोजीराजे गढी भोवतालच्या रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले. रुग्णालयाच्या पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचल्याने आरोग्यसेवा ही विस्कळीत झाली. १०० फुटी रोडवरील नगरपरिषदेचे गाळ्यांभोवती व आतमध्ये पाणी शिरल्याने गाळेधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. विद्या प्रतिष्ठान व इरा किड्स या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. सुरु असणा-या परीक्षा १८ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आठभाईमळ्यातील शेती जलमय झाली आहे.
दरम्यान या पावसामुळे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारचे आपले सर्व दौरे रद्द केले. प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या समवेत त्यांनी सणसर भागातील परिस्थितीची पहाणी केली. वातावरणात होत असणाऱ्या बदलामुळे वर्षाच्या सरासरी एवढा पाऊस एकाच दिवसात पडतो आहे. येणा-या १९ तारखेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी २९ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. ४१ लाख ५७ हजार एकर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे वित्त व मनुष्य वा पशुंची जीवितहानी झाली असेल तर या सर्वांचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानूसार तातडीने पंचनामे पूर्ण करण्यात यावेत. झालेल्या नोंदींनुसार नुकसान भरपाई दिली जाईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले. मे महिन्यात झालेल्या पावसानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सणसर परिसराची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने दिवाळीनंतर त्या कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात येतील. जानेवारीत ती कामे सुरु करुन मे महिन्यापर्यंत ती काम कशी पूर्ण होतील याकडे शासन लक्ष देईल, असे भरणे यांनी सांगितले.