राज्यातील नकाशावरील पाणंद रस्ते आता अवतरणार सातबारा उताऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 12:00 IST2026-01-09T12:00:37+5:302026-01-09T12:00:47+5:30

- नकाशावरील पाणंद रस्ते आता अवतरणार सातबारा उताऱ्यावर, भूमी अभिलेख विभागाची राज्यभरात मोहिम, प्रत्यक्ष जागेवरही आखण्यात येणार 

Panand roads on the state map will now appear on Satbara Utara | राज्यातील नकाशावरील पाणंद रस्ते आता अवतरणार सातबारा उताऱ्यावर

राज्यातील नकाशावरील पाणंद रस्ते आता अवतरणार सातबारा उताऱ्यावर

पुणे : राज्य सरकारने राज्यभरात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली असून, आता भूमी अभिलेख विभाग असे पाणंद रस्ते नकाशावर दिसत असल्यास त्यांची नोंद सातबारा उताऱ्यावर करणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील महिन्याभरात सुरू करण्यात येणार आहे. सातबारा उताऱ्यावर रस्त्याचा उल्लेख झाल्याने असे रस्ते मोकळे करून देण्यासाठी शेतकऱ्यांना जागा द्यावी लागणार आहे. परिणामी अनेक वर्षांपासूनचे पाणंद रस्त्यांसंदर्भातील वाद निकाली लागणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना असे पाणंद रस्ते उपलब्ध झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. 

शेतकऱ्यांसाठी पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी या कामांसाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी बारमाही रस्ते असणे आवश्यक असते. अनेक ठिकाणी अशा रस्त्यांवर अतिक्रमण झाले असून त्यांची गुणवत्ता पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांना मोठी समस्या जाणवते. या पार्श्वभूमीवर शेतरस्ते, पाणंद रस्ते अधिक प्रभावीपणे सक्षम करण्याकरिता त्यांची मजबुती करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेला ‘मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना, नाशिक’ असे नाव देण्यात आले आहे.

हे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी तसेच प्रत्यक्षात जागेवर उपलब्ध करून देण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अनेक शेतरस्ते पाणंद रस्ते नकाशावर उपलब्ध आहेत. मात्र, सातबारावर त्याचा उल्लेख नसल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातून पाणंद रस्ते रस्ता काढून देण्यास नकार देतात. प्रशासनाने हा रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यात न्यायालयीन प्रक्रिया होऊन त्यावर स्थगिती आणली जाते.

मात्र, आता भूमी अभिलेख विभाग नकाशावर असलेले रस्ते प्रत्यक्षात सातबारा उताऱ्यावर नोंदविणार आहे. त्यामुळे सातबारा उताऱ्यावरील पाणंद रस्त्याची आखणी शेतकऱ्याच्या संमतीने त्याच्या शेतातून केली जाणार आहे. सातबारा उतारा उल्लेख असल्यास शेतकरीही रस्त्याला विरोध करणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात या रस्त्यांची नोंदणी सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी राज्यभरात मोहीम आखण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांच्या काळामध्ये हे सर्व रस्ते सातबारा उताऱ्यावर दर्शविण्यात येणार आहेत. त्यानंतर नकाशा व प्रत्यक्ष क्षेत्र यांची पाहणी करून पाणंदरस्ते जागेवर आखण्यात येतील. त्यामुळे त्या भागातून जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही मोहीम सबंध राज्यभर राबविण्यात येणार असल्याने येत्या काळात राज्यातील पाणंद रस्त्यांची समस्या दूर होण्याची आशा भूमी अभिलेख विभागाला आहे.

नकाशावर असलेले रस्ते सातबारा उताऱ्यावर लावण्याची मोहीम सुरू करण्यात येत आहे. पुढील तीन महिन्यांत ही मोहीम पूर्ण करण्यात येऊन, महसूल विभागाच्या मदतीने पाणंद रस्ते प्रत्यक्षात जागेवर आखण्यात येतील.  - कमलाकर हट्टेकर, उपसंचालक, भूमी अभिलेख विभाग, पुणे.

Web Title : महाराष्ट्र में खेतों के रास्ते अब भूमि अभिलेखों में दर्ज होंगे

Web Summary : महाराष्ट्र खेतों के रास्तों को भूमि अभिलेखों में दर्ज करेगा, जिससे विवाद सुलझेंगे। किसानों को खेतों तक बेहतर पहुंच मिलेगी, परिवहन आसान होगा। एक राज्यव्यापी अभियान तीन महीनों में इन मार्गों का मानचित्रण और सीमांकन करेगा, जिससे किसानों को लाभ होगा।

Web Title : Farm Roads from Maps to Land Records in Maharashtra

Web Summary : Maharashtra will record farm roads on land records, resolving disputes. Farmers will have better access to fields, easing transport. A state-wide campaign will map and demarcate these routes in three months, benefiting farmers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.