टाेलनाका, बसस्टॅन्ड येथे सुद्धा देणार पाेलिओची लस : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 12:31 PM2020-01-19T12:31:02+5:302020-01-19T12:37:40+5:30

पल्स पाेलिओ लसीकरण माेहीम प्रभावीपणे राबविणार असल्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली.

Paleo vaccine will also be given at Tole plaza, Bus stand : Ajit Pawar | टाेलनाका, बसस्टॅन्ड येथे सुद्धा देणार पाेलिओची लस : अजित पवार

टाेलनाका, बसस्टॅन्ड येथे सुद्धा देणार पाेलिओची लस : अजित पवार

googlenewsNext

पुणे : पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी पल्स पोलिओ लसीकरण माेहीम प्रभावीपणे राबविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल. तसेच या मोहिमेदरम्यान प्रवासात असणाऱ्या बालकांना बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, टोलनाका अशा गर्दीच्या ठिकाणी देखील पोलिओची लस दिली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात पाच वर्षाखालील बालकांना पवारांच्या हस्ते पोलिओचा डोस देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्यसेवा विभागाचे उपसंचालक संजय देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, देशातून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याची जबाबदारी सामूहिक असून निरोगी पिढी घडवण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. पोलिओचा एकही रुग्ण राहणार नाही, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. भविष्यातही पोलिओचा रुग्ण आढळू नये, म्हणून लसीकरण माेहीम प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे. ही माेहीम आपल्या सर्वांची असून ती राबवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल,अशी ग्वाही देवून ते म्हणाले, या मोहिमेदरम्यान प्रवासात असणाऱ्या बालकांना बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, टोलनाका अशा गर्दीच्या ठिकाणी देखील पोलिओची लस दिली जाणार असून एकही बालक पोलीओ लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनी प्रशासनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Paleo vaccine will also be given at Tole plaza, Bus stand : Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.