Lek Ladki Yojana: २५ लाखांपैकी अवघे ८ लाख खर्च, फक्त ४१ मुली लाभार्थी, लेक लाडकी योजना पालकांना माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:10 IST2025-01-13T17:09:59+5:302025-01-13T17:10:27+5:30
मुलींची संख्या वाढावी, त्यांचे संगोपन चांगल्या पद्धतीने करता यावे, यासाठी महापालिकेने ‘लेक लाडकी’ योजनेची अंमलबजावणी केली आहे

Lek Ladki Yojana: २५ लाखांपैकी अवघे ८ लाख खर्च, फक्त ४१ मुली लाभार्थी, लेक लाडकी योजना पालकांना माहितीये का?
पुणे : राज्यात लाडकी बहीण योजनेची सातत्याने चर्चा होत आहे. पुणे महापालिकेने दहा वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातील लाडक्या लेकीचे संगोपन करण्यासाठी लेक लाडकी (मुलगी दत्तक योजना) योजना सुरू केली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये या योजनेसाठी २५ लाख रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी अवघे ८ लाख ४० हजार रुपये खर्च झाले असून, ४१ मुलींना लाभ मिळाला आहे. त्यामुळे ही योजना पालकाना माहित आहे की नाही याबाबत सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.
मुलींची संख्या वाढावी, त्यांचे संगोपन चांगल्या पद्धतीने करता यावे, यासाठी महापालिकेने ‘लेक लाडकी’ योजनेची अंमलबजावणी २०१४-१५ पासून सुरू केली आहे. स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी ही योजना सुरू केली आहे. शहरात प्रतिवर्षी जन्माला येणाऱ्या मुलींची संख्या २४ हजार २०० इतकी आहे. या योजनेसाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महापालिका हद्दीत संबंधितांचे ३ वर्षे वास्तव्य हवे, वार्षिक एक लाख रुपये उत्पन्न असल्याचा पुरावा हवा, मुलीच्या जन्मानंतर एक वर्षात महापालिकेकडे अर्ज करणे बंधनकारक, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. या योजनेमध्ये एक मुलगी असेल, तर महापालिकेचे ४० हजार आणि पालकांचे दहा हजार रुपये, दोन मुली असतील महापालिकेचे २० हजार रुपये आणि पालकांचे १० हजार रुपये, अशी एकत्रित रक्कम १८ वर्षे मुदतीने राष्ट्रीयीकृत बँकेत मुलगी, पालक आणि महापालिका यांच्या नावाने ठेवली जाते.
दोन मुली असताना दुसऱ्या मुलीच्या नावाने ही ३० हजार रकमेची ठेव ठेवली जाते. या ठेवीतून पालकांना सुमारे दीड लाखाहून अधिक रक्कम मिळू शकते, अशी योजना आहे. या योजनेला २०१४-१५ यावर्षी सुरुवात झाली. तेव्हा या योजनेला सर्वांत चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यानंतर प्रतिसाद कमी झाला आहे. त्यामुळे सुरुवातीला पाच कोटीची तरतूद केली होती. त्यानंतर ही तरतूद २ कोटी ते १ कोटी रुपये केली जात होती. मात्र, अपेक्षेपेक्षा प्रतिसाद कमी मिळत असल्याने ही तरतूद कमी करून प्रशासनाने ती २५ लाखांपर्यंत आणली आली आहे. पुणे महापालिकेने २०२३-२४ मध्ये लेक लाडकी योजनेसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात २५ लाखांची तरतूद केली होती. त्यापैकी अवघे ८ लाख ४० हजार रुपये खर्च झाले असून, ४१ मुलींना लाभ मिळाला आहे. त्यामुळे या योजेनची माहिती नागरिकांपर्यंत पोचत नसल्याचेही वास्तव आहे.
कोरोनामुळे केवळ सहा लाभार्थी
कोरोनामुळे २०२१-२२ मध्ये पुणे महापालिकेच्या लेक लाडकी योजनेला प्रतिसाद कमी मिळाला, तेव्हा केवळ सहा मुलींच्या पालकांनी या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेतला आहे.
शहरातील गोरगरीब नागरिकांच्या लेकीसाठी ही योजना आहे. मी स्थायी समिती अध्यक्ष असताना ती सुरू केली होती. या योजनेची गेल्या काही वर्षांपासून जनजागृती करण्यात पुणे महापालिका प्रशासन कमी पडत आहे. त्यामुळे या योजनेच्या जनजागृतीवर भर दिला पाहिजे. - बाबूराव चांदेरे, माजी अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका
मुलगी दत्तक योजनेसाठी अर्ज ऑनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत असलेली रक्कम ठेव म्हणून सुरुवातीच्या काळात राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवली जात होती. मात्र, या बँकेचे ठेवीवरील व्याजदर कमी झाल्यामुळे आता पोस्ट खात्याच्या किसान विकास पत्रामध्ये ठेवली जात आहे. वयाच्या १८ वर्षांपर्यंत ही रक्कम काढता येत नाही. या योजनेची माहिती नागरिकांना होण्यासाठी महापालिका जाहिरात करते. या योजनेत अर्ज करणाऱ्या नागरिकांना या योजनेचे लाभ दिले जातो. या याेजनेचा नागरिकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा. - नितीन उदास, उपायुक्त, समाज विकास विभाग, पुणे महापालिका.
मागील दहा वर्षांतील चित्र काय?
वर्ष - लाभार्थींची संख्या
२०१४-१५ : ३५५
२०१५-१६ : ७८
२०१६-१७ : ११४
२०१७-१८ : ८६
२०१८-१९ : १३५
२०१९-२० : ६८
२०२०-२१ : ६
२०२१-२२ : १८
२०२२-२३ : ५१
२०२३-२४ : ४१