'आमचं आयुष्य शेतीवर, निसर्ग साथ देत नसेल, तर शासनाने आधार द्यावा' अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 12:07 IST2025-10-28T12:07:25+5:302025-10-28T12:07:37+5:30
अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी जवळपास वर्षभर कष्ट घेऊन उभ्या केलेल्या या पिकांचे आता अक्षरशः चिखलात रूपांतर झाले आहे

'आमचं आयुष्य शेतीवर, निसर्ग साथ देत नसेल, तर शासनाने आधार द्यावा' अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल!
ओतूर : महाराष्ट्र राज्यातील हवामान हे नेहमीच ऋतुचक्रानुसार बदलत असते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन ऋतूंनी येथील जीवनमानाला आणि व्यवसायांना एक विशिष्ट लय दिली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या ऋतुचक्रावरही हवामान बदलाचा मोठा परिणाम जाणवू लागला असून, चालू वर्षी त्याचा फटका शेतकऱ्यांना चांगलाच बसला आहे.
पावसाळा ऋतू अधिकृतरीत्या संपून जवळपास एक महिना उलटून गेला असतानाही, ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सर्व गणितच बिघडवले आहे. गेल्या काही दिवसांपासून माळशेज परिसरातील ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, अहिनवेवाडी, उदापूर, डोंगरे, मढ, कोपरे मांडवे, धोलवड, हिवरे खुर्द, नेतवड, पिंपळगावजोगा, डुंबरवाडी, मांदारने, बल्लाळवाडी आणि आसपासच्या गावांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे.
या अवकाळी पावसामुळे कांदा, भात, गहू, टोमॅटो आणि भाजीपाला अशा सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जवळपास वर्षभर कष्ट घेऊन उभ्या केलेल्या या पिकांचे आता अक्षरशः चिखलात रूपांतर झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग निराश, खचलेला आणि असहाय्य अवस्थेत उभा आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कोपामुळे हिरावला जात आहे एवढी मेहनत, एवढे कष्ट करूनही पिकांचे हे हाल होताना बघणे मन हेलावून टाकणारे आहे.” काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना नुकसानीमुळे पुढील हंगाम कसा पार पाडायचा, कर्ज कसे फेडायचे, या चिंतेने ग्रासले आहे.
याशिवाय, कीटक रोगराई, बुरशीजन्य संसर्ग आणि सततचे आर्द्र वातावरण यामुळे तयार भातपिकांवर दुष्परिणाम झाला असून, त्यामुळे “काय पेरावे, काय करावे?” हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. एकीकडे शेती हा व्यवसाय दिवसेंदिवस महागडा होत चालला आहे, तर दुसरीकडे निसर्गाची अवकृपा संपत नाही. बियाणे, खत, औषधे आणि मजुरी या सगळ्यांवर खर्च वाढत असताना, उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांच्या ओझ्याचे पर्वत झाले आहेत. बहुतांश शेतकरी कर्जाच्या जाळ्यात अडकलेले असून, आता पिकांचे नुकसान झाल्याने त्यांची अवस्था आणखीन बिकट झाली आहे. “आमचं आयुष्य शेतीवर अवलंबून आहे; जर निसर्ग साथ देत नसेल, तर शासनानं तरी आधार द्यावा,” अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.